भोकरमध्ये अवैध वाळू वाहतुकीसह वाळू ठाण्याने गाठला कळस
तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या निलंबनाची जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी
जीविताला धोका असल्याने पोलीस संरक्षणाचीही मागणी
भोकर /प्रतिनिधी/भोकर शहर व तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू वाहतूक आणि साठवणुकीने कळस गाठला असून, यामध्ये स्थानिक महसूल प्रशासनाचे संगनमत असल्याचा खळबळजनक आरोप पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष आनंदराव भालेराव यांनी केला आहे. या प्रकरणी तहसीलदार विनोद गुंडमवार यांना दोषी धरुन तात्काळ निलंबित करावे आणि आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे, या मागणीसाठी भालेराव यांनी जिल्हाधिकारी, नांदेड यांना निवेदन दिले आहे.
प्रशासनाकडून वाळू माफियांना अभय?
___________________
निवेदनात नमूद केल्यानुसार, भोकर परिसरात वाळू माफियांनी हजारो ब्रास वाळूचे साठे करून ठेवले आहेत. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. यासंदर्भात भालेराव यांनी वेळोवेळी आंदोलने आणि उपोषणे केली. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. १५ ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान केलेल्या उपोषणावेळी तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी केवळ ९० ब्रास वाळू साठा असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात हजारो ब्रास साठा उपलब्ध असताना केवळ ९० ब्रासचा आकडा सांगणे म्हणजे वाळू माफियांना पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप भालेराव यांनी केला आहे.
CDR आणि SDR तपासण्याची मागणी
नोव्हेंबर २०२५ पासून अवैध वाळू वाहतुकीवर कोणतीही मोठी कारवाई झालेली नाही. दिवसाढवळ्या १५ ते २० हायवा गाड्यांची वाहतूक सुरू असताना ‘गौण खनिज नियंत्रण पथक’ केवळ कागदावरच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार आणि वाळू माफियांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करत, भालेराव यांनी तहसीलदारांच्या मोबाईल क्रमांकाचा २३ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीतील CDR (Call Detail Record) आणि SDR काढल्यास वाळू तस्करांसोबतचे त्यांचे साटेलोटे उघड होईल, असा दावा केला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत अवैध वाळू वाहतूक व साठा करणे याविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला साथ देत भालेराव यांनी हे पाऊल उचलले आहे. वाळू माफियांविरोधात आवाज उठवल्यामुळे आता आपल्याला धमक्या येत असून जीविताला धोका निर्माण झाला आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,
तहसीलदार विनोद गुंडमवार यांना तात्काळ निलंबित करावे.
विशेष गोपनीय पथकाद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.
तालुक्यातील सर्व अवैध वाळू साठे जप्त करून त्यांचा लिलाव करावा किंवा घरकुल लाभार्थ्यांना ती वाळू मोफत द्यावी.
तक्रारदार सुभाष भालेराव यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.
या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी, भोकर यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आल्या आहेत. आता या संवेदनशील विषयावर जिल्हाधिकारी काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
