‘केशर’साठी करावी लागेल मे अखेरपर्यंत प्रतीक्षा ▪हवामानाच्या अस्थिरतेमुळे आंबा उत्पादनाला विलंब

विजय पगारे / सोयगाव प्रतिनिधी
या उन्हाळ्यात आंबा शौकिनांना आंब्यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. मार्च अखेरपर्यंत आंबा बाजारात दाखल होत असतो. मात्र यंदा लांबलेल्या पावसामुळे आंब्याचे आगमन महिनाभर उशिराने होणार आहे. त्यातही केशरचा आस्वाद घेण्यासाठी आंबाप्रेमींना थेट मे अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. आतापर्यंत आंब्याला फुलोरा येणे अपेक्षित होते मात्र, हवामानात झालेल्या अनपेक्षित बदलांमुळे आंब्याच्या बहरावर परिणाम झाला असल्याने यंदा आंबा सिझन उशिराने दाखल होणार असल्याचे कृषी शास्त्रज्ञानी सं सांगितले आहे.
साधारणपणे नोव्हेंबर अखेरपर्यंत आंब्याला फुलोरा येण्यास सुरवात होते. परंतु, यंदा फुलोऱ्याला उशीर होतो आहे. यावेळेस खान्देशसह राज्यात पावसाने चांगलाच मुक्काम ठोकला. अनेक ठीकाणी अतिवृष्टी झाली. त्यातच जोरदार परतीच्या व अवकाळी पावसाने फळबागांना झोडपून टाकले. त्यामुळे फळबहरावर विपरीत परिणाम घडून येत आहे. अंदाजे नोव्हेंबर अखेरपर्यंत आंबा मोहोर धरतो व मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत फळ उत्पादनाला सुरवात होते. मात्र, यंदा आंबाप्रेमींना महिनाभर प्रतीक्षा कारवाई लागण्याची चिन्हे आहेत.
पुढील काही दिवसात जर थंडीचा ओघ वाढून वातावरण अनुकूल राहिल्यास चांगला मोहोर बाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्ष उत्पादनाला उशीर होणारच आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे एप्रिल शेवटच्या आठवड्यात येणारा केशर यंदा मे च्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होऊ शकेल. केशरसोबतच रत्न, तोतापुरी, पायरी, हापूस व इतर आंबा प्रजातींनाही यंदा उशीर होणार असल्याची माहिती निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी दिली.

“डायबॅक बुरशीमुळे विपरीत परिणाम”
▪यंदा पावसाळ्याअखेरीस झालेल्या अतिरिक्त पावसामुळे आंबा बागांमध्ये मोठया प्रमाणात पाणी साचले होते. या अतिरिक्त पाण्यामुळे आंबा झाडांच्या शेंड्यापासून खाली फांद्या वाळायला सुरवात झालेली आहे.
याला कृषी शास्त्रज्ञ Dieback (डायबॅक) म्हणतात. हा एक प्रकारच्या बुरशीचा प्रकार आहे. यात फांद्या शेंड्यांपासून वाळायला सुरवात होते व हळूहळू खालपर्यंत याचा प्रादुर्भाव होतो. याचा परिणाम आंबा मोहोरवरही दिसून येतो. राज्यभरात सतत पाऊस पडलेल्या क्षेत्रांवर हीच स्थिती आहे. सततच्या पावसामुळे बागेमध्ये आर्दता वाढीस लागली व ही आर्दता बुरशीच्या वाढीस पोषक ठरत आहे. बुरशीमुळे झाडांच्या मुळांना प्राणवायू व अन्नद्रव्य शोषून घेण्यास अडचण होत असल्याने झाडांच्या खोडांमधून अन्नद्रव्यांचे वहन झाडांकडे होण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी झाडांच्या फांद्या वाळण्यात सुरवात झालेली असल्याचे चित्र बहुतांशी आंबा बागांमध्ये दिसून येत आहे.

“यंदा आंबा उशिरानेच”
▪खान्देशात आतापर्यंत सर्व आंबे मोहरले पाहिजे होते. परंतु लांबलेल्या पावसामुळे आंब्याला फुलधारणा होण्यासाठी आवश्यक असणारा ताण यावर्षी बसलेला नाही. त्यामुळे यंदा आंब्याची फुलधारणा उशिराने होणार आहे. अवकाळी पावसामुळे फळधारणेवर विपरीत परिणाम घडून आलेला आहे. अपेक्षित ताण मिळण्यात यामुळे आडकाठी आलेली आहे. फुलोरा बाहेर पडण्यासाठी ताण महत्वाचा ठरतो. त्यामुळे यंदा आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
– युवराज वामने ( निसर्ग मित्र समिती सोयगाव तालुका अध्यक्ष)

Google Ad