कवी संमेलनातून निसर्ग संवर्धनाचा संदेश.कवींनी आपल्या कविता,गीता द्वारे केले निसर्ग वाचविण्याचे आवाहन.
Adiwasi kranti Marathi news portal
उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )
कोकण मराठी साहित्य परिषद उरण व मधुबन कट्टा यांच्यातर्फे शनिवार दि 17 जून रोजी सायंकाळी विमला तलाव उरण येथे 92 वे कविसंमेलन आणि जीवनगौरव सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमाला उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार , आदर्श शिक्षिका शारदा खारपाटील,पत्रकार विठ्ठल ममताबादे,अजय शिवकर मधुबन कट्ट्याचे सूर्यकांत दांडेकर यांच्यासह जेष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.या कविसंमेलनात आदर्श शिक्षक संजय होळकर , प्रा .एल बी पाटील, सेवानिवृत्त शिक्षक भ. पो. म्हात्रे,निमंत्रित कवी केशव म्हात्रे,स्वागताध्यक्ष भरत पाटील,रमण पंडीत, राम म्हात्रे,भालचंद्र म्हात्रे,अनुज शिवकर आदींनी कविता सादर केल्या.या कविसंमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ नागरिक चंद्रकांत मुकादम यांना देण्यात आले होते.या कविसंमेलनात 47 कवी उपस्थित होते.यावेळच्या कवितेचा विषय होता आगमन पावसाचे-रक्षण पर्यावरणाचे.त्यामुळे सर्व कवींनी आपल्या गितातून, कवितेतून पर्यावरण संरक्षणाचा, संवर्धनाचा संदेश दिला. व सजीव सृष्टी, निसर्ग वाचविण्याचे सर्वांना आवाहन केले.या कार्यक्रमात महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील,सिता पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रा.राजेंद्र मढवी यांचे वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या मनोगतात कविसंमेलनाची वाहवा केली आणि शुभेच्छाही दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार म.का.म्हात्रे गुरुजी यांनी केले .प्रत्येक महिन्यात 17 तारखेला उरण मधील विमला तलाव येथे कवी संमेलन भरत असते. या कवी संमेलनाला दिवसेंदिवस जेष्ठ नागरिकांसह युवकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.