दिपराज थळी लोकराजा शाहू महाराज सन्मान पुरस्काराने सन्मानित
Adiwasi kranti Marathi news portal
उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे ) लोकराजा राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव 2023 (वर्ष 2 रे)चे आयोजन रविवार दि 25 जून 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांना लोकराजा शाहू सन्मान पुरस्कार 2023 ने गौरविण्यात आले . यावेळी उरण तालुक्यातील करंजा गावचे सुपुत्र उत्तम अभिनेता दिपराज चंद्रकांत थळी (करंजा आगरीपाडा ) यांना नाट्य – चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लोकराजा शाहू महाराज सन्मान पुरस्कार 2023 ने गौरविण्यात आले.
दीपराज थळी हे उत्तम अभिनेते असून झी मराठी चॅनलवर सुरू असलेली मराठी मालिका ‘तुला शिकविन चांगलाच घडा’ या मालिकेत ‘गण्या’ ची भूमिका उत्तमपणे साकारली आहे. गण्याची भूमिका साकारुन दीपराज यांनी लाखो प्रेषकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रविण तरडे यांच्या हस्ते शाल गुलाबपुष्प सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी माजी सांस्कृतिक मंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उरण तालुक्याचे सुपुत्र दिपराज थळी यांना पुरस्कार पुरस्कार मिळाल्याने उरण तालुक्यांचे नाव उंचावले आहे. पुरस्कार मिळाल्याने दिपराज थळी यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.