वीर वाजेकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग व केअर ऑफ नेचर यांच्या संयुक्त विद्यमाने तु.ह. वाजेकर विद्यालय, फुंडे येथे सर्प समज गैरसमज जनजागरुकता अभियान संपन्न.
उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स महाविद्यालय, महालण विभाग, फुंडे च्या प्राणिशास्त्र विभाग व केअर ऑफ नेचर च्या वतीने तू. ह. वाजेकर हायस्कूल फुंडे येथील विद्यार्थ्यांसाठी नागपंचमी निमित्ताने सर्प समज गैरसमज जन जागरुकता अभियान घेण्यात आले.
एच. एन. पाटील ह्यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, तर प्राचार्य एस. जी. म्हात्रे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीर वाजेकर कॉलेजचे प्राणिशास्त्र विभाग प्रमूख, डॉ आमोद ठक्कर यांनी केले त्यात त्यांनी नागपंचमी च्या दिवशी आपण नागाची पूजा करतो त्याला आपले दैवत मानतो आणि वर्षभर त्याला शत्रू मानून दिसेल तिथे मारतो हे केवळ गैरसमजामुळे. सर्प अन्न साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उंदिर त्याचे अन्न आहे. उंदिराची प्रजनन क्षमता प्रचंड आहे. साप राहिले नाहीत तर उंदिर 30 टक्के अन्न फस्त करतील, आपल्या साहित्याची आणि मालमत्तेचे नुकसान करतील, अनेक प्रकारची रोगराई पसरवतील. हे सगळे टाळायचे असेल तर आपल्याला सापांचे संरक्षण करावे लागेल पर्यायाने निसर्गाचेही संवर्धन होईल. तसेच सापापासून वैद्यकीय उपचारासाठी होणारे फायदे नमूद केले.
प्रमुख वक्ते केअर ऑफ नेचर चे राजू मुंबईकर, महाराष्ट्र भूषण, ह्यांनी सर्प हा मांसाहारी प्राणी आहे. त्याला दुध लाह्या देऊन त्याला अपाय करू नये असे आवाहन केले. तसेच सापांचे संदर्भात असलेले गैरसमज ज्यामध्ये साप बदला घेतो, पाठलाग करतो, रुप बदलून येतो, हे सर्व वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे चुकीचे आहेत हे विस्तृत पणे समजावून सांगितले. जगात सापांच्या सुमारे तीन हजार जाती आहेत. भारतात साधारणतः 275 जातीचे साप आढळतात. हे साप तीन प्रकारचे असतात विषारी, निमविषारी व बिनविषारी. आपल्या परिसरात नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापडा फक्त एवढेच विषारी साप आहेत. यांना कसे ओळखायचे, त्यांचा खुराक, सवयी, इत्यादींची सविस्तर माहिती दिली. तसेच अनेक बिनविषारी अजगर, नानेटी, मांडूळ, धामण, हरणटोळ, कवड्या इत्यादि सर्पांची ही सचित्र ओळख करून दिली. सर्प मानवाचा मित्र कसा आहे केवळ अंधश्रद्धेमुळे आपण त्याला शत्रू मानतो ह्याची उदाहरणा सहित विस्तृतपणे माहिती दिली व इथुन पुढे साप हा आपला मित्र समजून आपल्या स्वार्थासाठी त्याचे रक्षण करावे असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सहभाग नोंदविला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा पंकज भोये, डॉ श्रेया पाटील, माळी मॅडम, सदानंद म्हात्रे ह्यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यालयातील शिक्षक व शिक्षेतर सेवक, केअर ऑफ नेचरचे पदाधिकारी अनिल घरत यांच्यासह केअर ऑफ नेचरचे पदाधिकारी सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.