शेतकरी प्रबोधिनी संस्थेच्या पाठपुरावामुळे उरणच्या नागरिकांच्या सनद/प्रॉपडी कार्ड चा प्रश्न मार्गी लागणार.
उरण दि. 30 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील बालई काळा धोंडा गावठाण हद्दीत मागील अनेक वर्षापासून राहते घरे यास सनद / प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ पंचनामा करून सात बारा सदरी नोंद करण्यात यावे यासाठी शेतकरी प्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरु होता. या प्रकरणात शेतकरी प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पाटील यांनीही जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या अन्यायाला वारंवार वाचा फोडली आहे. शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केल्याने दि 1/9/2023 रोजी सकाळी 11.30 वाजता उरण तहसिल कार्यालयात मौजे बालई काळा धोंडा गावठाण हद्दीतील सर्व – ग्रामस्थ, व महत्वाच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक लावल्याने आता मौजे बालई काळाघोडा गावठाण हद्दीतील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल सनद / पॉपर्टी कार्डचा प्रश्न शेतकरी प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे.
दि. 1/9/2023 रोजी सनद / प्रॉपर्टी कार्ड संदर्भात उरण तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस उरणचे तहसीलदार उद्धव कदम,कार्यकारी अभियंता (अतिक्रमण विभाग) सिडको कार्यालय उरण, उप अधीक्षक भूमी अभिलेख उरण,मंडळ अधिकारी उरण,तलाठी सजा चाणजे,ग्रामसेवक चाणजे , शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील,बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकीतून मौजे बालई काळा धोंडा गावठाण हददीतील मागील अनेक वर्षापासूनचे राहते घरांना सनद/ प्रॉपर्टी कार्ड मिळून त्याची नोंद सातबारा उतारावर होणार आहे. त्यामूळे उरणकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे शेतकरी प्रबोधिनी या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पाटील यांनी सांगितले. बालई काळाधोंडा गावठाण हद्दीत आगरी, कोळी, कराडी, चर्मकार, मातंग आदी समस्त मागासवर्गीय जनता राहत असून 122 एकर गावठाणाचे सीमांकन होउन लवकरच शेतकरी प्रबोधिनीच्या माध्यमातून मौजे बालई काळा धोंडा गावठाण हददीतील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या घराचे सनद/ प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहेत. शेतकरी प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.शेतकरी प्रबोधिनी या संस्थेच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे आता शेतकऱ्यांचा, नागरीकांचा सनद/ प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांनी,शेतकऱ्यांनी शेतकरी प्रबोधिनी या संस्थेचे जाहिर आभार मानले आहेत.