महिला व एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल ; उत्पादन शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी अद्यापही बिलोलीत..मुक्कामी
भोकर : मानवी आरोग्यास हानिकारक असलेली अवैध रसायन मिश्रित शिंदी भोकर शहरातील आलू नगर येथे विक्री करत असलेल्या एका महिलेस काल पकडल्याचा गुन्हा ताजा असतांनाच आज दि.१० ऑक्टोंबर रोजी भोकर पोलीसांनी छापा टाकून अवैध रसायन मिश्रित शिंदी विक्री करत असलेल्या नंदी नगर येथील एका महिलेस व वडार गल्लीतील एका तरुणास रंगेहाथ पकडले असून त्यांच्या जवळील १ लिटरच्या प्रत्येकी ५० पिशव्या अशी एकूण १०० लिटर रसायन मिश्रित शिंदी जप्त केली आहे.
अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी दि.१० ऑक्टोंबर २०२३ रोजी कर्तव्यावर निघालेल्या भोकर पोलीस ठाण्यातील पो.उप. नि.दिगांबर पाटील,सहाय्यक पो.उप.नि.दिलीप जाधव,जमादार प्रकाश वाळवे,पो.कॉ.परमेश्वर कळणे व एक महिला पोलीस कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली की,भोकर शहरातील नंदी नगर आणि वडार गल्ली येथे चोरट्या मार्गाने रसायन मिश्रित शिंदीची अवैध विक्री होत आहे.ही माहिती पो.नि. नानासाहेब उबाळे यांना सदरील पथकाने दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने दि.१० ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२:३०. वाजताच्या दरम्यान नंदी नगर भोकर येथे साफळा रचून एका नायलॉनच्या मोठ्या पिशवीमधे ठेवलेल्या आंबट उग्र वास येत असलेल्या पॉलिथिनच्या छोट्या छोट्या पिशव्यांतून पांढऱ्या रंगाचे रसायन मिश्रित द्रव्यरुपी शिंदी नावाचे नशेली द्रव्य विक्री करत असलेल्या एका महिलेस तिच्या राहत्या घरी रंगेहाथ पकडले.चौकशी केलेली असता तिचे नाव चंद्राबाई खंडू जिंकलवाड(४४) रा.नंदी गल्ली भोकर असे असल्याचे समोर आले असून तिच्या जवळील जवळपास १ हजार ५०० रुपये किमतीच्या उपरोक्त उल्लेखित नशेली द्रव्याच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
तर दुपारी १२:५० वाजताच्या दरम्यान याच पोलीस पथकाने वडार गल्ली भोकर येथे सापळा रचून आंबट उग्र वास येत असलेल्या पॉलिथिनच्या छोट्या छोट्या पिशव्यांतून पांढऱ्या रंगाचे रसायन मिश्रित द्रव्यरुपी शिंदी नावाचे नशेली द्रव्य अवैधरित्या विक्री करत असलेल्या एका तरुणास त्याच्या राहत्या घरी रंगेहाथ पकडले.चौकशी केली असता त्याचे नाव श्रीनिवास बंडू रॅपनवाड(२०) रा.वडार गल्ली भोकर असे असल्याचे समोर आले असून त्याच्या जवळील जवळपास १ हजार ५०० रुपये किमतीच्या उपरोक्त उल्लेखित नशेली द्रव्याच्या रसायन मिश्रित शिंदीच्या ५० पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.३ हजार रुपयाचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उपरोक्त दोन्ही गुन्ह्या बाबद पो.कॉ.परमेश्वर कळणे यांनी रितसर सरकारी फिर्याद दिल्यावरुन चंद्राबाई खंडू जिंकलवाड(४४) रा.नंदी गल्ली भोकर आणि श्रीनिवास बंडू रॅपनवाड(२०) रा.वडार गल्ली भोकर या दोघांविरुद्ध अनुक्रमे गु.र.नं.३४७/ २०२३ व गु.रनं.३४८/२०२३ प्रमाणे कलम ६५ इ, महाराष्ट्र दारुबंदी कायदा नुसार भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पो.उप.नि.दिलीप जाधव हे पुढील अधिक तपास करत आहेत.
उत्पादन शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी अद्यापही बिलोलीतच…
गेल्या काही दिवसांपासून भोकर शहर व गाव खेड्यात चोरट्या मार्गाने रसायन मिश्रित शिंदी व दारुची अवैध विक्री होण्याचा गोरख धंदा वाढलेला आहे.अत्यल्प दरात हे नशेली जीवघेणी द्रव्य शाळकरी विद्यार्थी व तरुणांना सहजरित्या उपलब्ध होत असल्याने ते नशेच्या आहारी पडत आहेत.नव्हे तर काही जण या नशेमुळे बळी गेले आहेत.सदरील गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन या गोरख धंद्यावर आळा घालण्याची पोलीसांची जेवढी जबाबदारी आहे,त्यापेक्षाही मोठी जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची ही आहे.परंतू बिलोलीहून भोकर तालुक्याचा कारभार पाहणाऱ्या उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी याकडे कमालीचे दुर्लक्ष होतांना निदर्शनास येत आहे.मार्च महिना,दिवाळी व अन्य काही विशेष दिनाच्या औचित्याने भोकर तालुक्याची जबाबदारी असलेले ते उत्पादन शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी,कर्मचारी आपले आणि खात्याचे ‘शुल्क’ गोळा करून जाण्यासाठी तत्परतेने येतात,असे अनेकांतून बोलल्या जात आहे.परंतू भोकर शहर व गाव खेड्यात हा गोरखधंदा सुरु असतांना येथे येऊन सदरील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी ही तत्परता ते का दाखवित नाहीत ? यावर प्रश्नचिन्ह उभे आहे.काल दि.९ ऑक्टोंबर रोजी भोकर पोलीसांनी एक गुन्हा दाखल केला व आज दि.१० ऑक्टोंबर रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.असे असतांनाही उत्पादन शुल्क विभागाच्या भोकर तालुक्याच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची अद्यापही दखल घेतली नसल्याचे भोकर येथे ते न आल्यावरुन दिसत आहे.या अवैध धंद्यास संबंधित विभागाच्या ‘त्या’ काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ‘अभय’ आणि ‘वरदहस्त’ असल्याचे ही यामुळेच चर्चिल्या जात आहे.उत्पादन ‘शुल्क’ त्या काही अधिकाऱ्याचे वाढो अथवा सरकारचे ? परंतू कोणाचेही नाहक बळी जाऊ नयेत यासाठी सदरील अवैध धंद्यावर आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.यामुळेच पोलीस विभागासह उत्पादन शुल्क विभागानेही सदरील अवैध धंद्याविरुद्ध तात्काळ कारवाई करावी,अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.