भोकर येथील जी.प.केंद्रीय नूतन शाळेच्या जागेत दुकानदारांनी केले अतिक्रमण सुरू
अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला शाळेचा परिसर
भोकर (तालुका प्रतिनिधी )शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नांदेड रोडवर जिल्हा परिषदेची केंद्रीय नूतन शाळा असून सदर शाळेसमोर असलेल्या दुकानदारांनी शाळेच्या जागेत अतिक्रमण करून दुकाने वाढवित असल्याने भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळेची जागा हडप होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे.
भोकर शहरात मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जिल्हा परिषदेची केंद्रीय नूतन शाळा असून इथे पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात जवळपास 900 विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असून मागील काही वर्षापासून शाळेसमोर असलेल्या दुकानदारानी अतिक्रमण करून शाळेचा परिसर व्यापून टाकला आहे शाळेसमोर दुकाने टाकून मोठ्या प्रमाणावर घाण केली जाते शाळेमध्ये हॉटेलची घाण आणून टाकल्या जाते घाण पाणी सोडल्या जाते मांस विक्रीचे दुकाने सुद्धा असल्याने सर्व घाण शाळेत आणून टाकली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे
शाळेच्या जागेत पुन्हा झाले अतिक्रमण सुरू
भोकर येथील जी.प.केंद्रिय नूतन शाळेसमोरील दुकाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम काही दिवसापूर्वी सुरू करण्यात आली होती त्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया झाल्यामुळे अडथळे आल्याने अतिक्रमण तसेच राहिले शाळेसमोर असलेल्या दुकानादारांनी दुकानाच्या मागील शाळेच्या जागेमध्ये हळूहळू अतिक्रमण सुरू केले आहे जेवढी पूर्वी जुनी दुकान होती त्यापेक्षा दुकाने वाढ होत आहेत अनेक दुकानदारांनी जी.प.च्या नूतन शाळेच्या जागेमध्ये आपली दुकाने मागच्या बाजूने वाढवली आहेत 24 डिसेंबर 2023 रोजी काही दुकानदारानी आपले दुकाने मागे हटवून दुकानांची दुरुस्ती सुरू केली कुणी काही म्हणत नाही अशा अविर्भावात दुकानदार राहत असून नगरपरिषद विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
जि.प. शाळेत होणाऱ्या अतिक्रमणाबाबत तक्रार करणार
भोकर येथील जि.प. केंद्रीय नूतन शाळेच्या जागेत गेली काही दिवसापासून दुकानदारांनी मागील बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू केले असून शाळेचा परिसर व्यापला आहे,हॉटेलचे घाण पाणी शाळेसमोर सोडले जाते,कचरा शाळेमध्ये टाकल्या जातो,अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे,शाळेसमोर असणाऱ्या दुकानदाराने हळूहळू मागील बाजूने आपली दुकाने वाढवणे सुरू केले असून ज्या दुकानदारांनी शाळेच्या जागेत अतिक्रमण केले आहे त्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी आपण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करणार असल्याचे माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चोथे यांनी दिली,शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन आपण याबाबत वरिष्ठा कडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले, सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जिल्हा परिषदेची सरकारी शाळा शहरातील मोठी शाळा असून त्या शाळेचा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने येणाऱ्या काळात गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होणार आहे