भोकर येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी यांची बैठक.


भोकर तालुक्यातील गाव पातळीवर काम करणारे तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक विस्तार अधिकारी व कृषी सहाय्यक तसेच इतर विभागाचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांची तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन व खरीप हंगाम पूर्वतयारी विषयक बैठक घेण्यात आली.
यामध्ये मान्सूनपूर्व कालावधीत करावयाची नगरपरिषद व ग्रामपंचायतच्या वतीने नालेसफाई कचरा व्यवस्थापन, रस्ता दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते व पुलांची दुरुस्ती, रस्ता दुतर्फा नाली काढणे जलसंधारण विभागाच्या वतीने तलावातील गाळ काढणे, तलाव व सांडव्यांची दुरुस्ती, विद्युत वितरण विभागाच्या वतीने वीज वितरण करणारे खांब व तारांची दुरुस्ती, आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक औषधी व साधनसामग्रीची उपलब्धता, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करावयाचे विविध कामे, तसेच पोलीस महसूल व इतर विभागांनी समन्वयातून करावयाची कामे, आपत्तीच्या प्रसंगी तातडीने द्यावयाचा प्रतिसाद व करावयाच्या उपायोजना याबाबत सर्व संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात नकाशावरील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करणे, जलसंधारण व वृक्ष लागवडीचे कामे करण्याबाबत नियोजन करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी याबाबत निर्देश देण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी एम.एन. केंद्रे, पोलीस निरीक्षक सुभाष मारकड, मुख्याधिकारी मारोती जगताप, तालुका कृषी अधिकारी जाधव, गटशिक्षणाधिकारी एम.जी. वाघमारे, जि. पं बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी संदेश जाधव, विद्युत वितरण विभागाचे उपअभियंता भूषण आचार्य, मृद व जलसंधारण विभागाचे सहाय्यक अभियंता डी.डी. गायकवाड, नगर परिषदेचे उपाभियंता माधव जमदाडे नायब तहसीलदार महसूल उमर सय्यद, नैसर्गिक आपत्ती विभागाचे अवल कारकून मिलिंद टोणपे यांची उपस्थिती होती.

Google Ad