लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली.

बहुजन टायगर युवा फोर्सच्या आंदोलनाला प्रशासनाकडून प्रतिसाद.

नांदेड –
वृद्ध कलावंतांच्या मानधनाची सन् २०२३- २४ रखडलेली निवड यादी जाहीर करण्यासह त्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अभिवचन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा,मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिल्याने बहुजन टायगर युवा फोर्स च्यावतिने लोकपारंपारिक कलावंतांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरु केलेले आंदोलन तुर्त स्थगित केले.लोकपारंपारिक कलावंतांनी भजन आंदोलन करुन आज क्रांतीदिनी जिल्हा परिषद दणाणून सोडली होती.
अधिक माहिती अशी की,राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत सन् २०२३- २४ या वर्षातील निवड यादी तत्कालीन समितीच्या मान्यतेनंतरही गत अनेक महिन्यांपासून संबंधित विभागाने जाहीर केली नाही.त्यामुळेच तत्कालीन जिल्हास्तरीय समितीच्यावतिने आज आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्यांना पाठींबा देऊन बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र च्या पदाधिकाऱ्यांसह लोकपारंपारिक कलावंतांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज केलेल्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणून सोडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा,मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी तातडीने या भजन आंदोलनाची दखल घेऊन याबाबत आपल्या दालनात बैठक घेतली व जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा,समितीचे तत्कालीन सदस्य सचिव संदिप माळोदे,सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार,समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार,पंचायत विभागाचे गटविकास अधिकारी ढवळे आदींसह आंदोलनकर्ते समिती व बहुजन टायगर युवा फोर्सच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन या प्रकरणात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व संबंधित विभागाच्या वरिष्ठांनाही अवगत करुन देत मुकाअ करनवाल यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन समाजकल्याण विभागाला दिलेल्या आदेशानुसार त्यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांना याबाबत मार्गदर्शन मागविले असून सदरच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अभिवचन दिल्यानंतर आंदोलन तुर्त स्थगित करण्यांत आले.
या भजन आंदोलनात मान्यवर वृद्ध साहित्यिक व मान्यवर वृद्ध कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय अशासकीय समितीचे उपाध्यक्ष विलास महाराज बोडगे,सदस्य शाहीर सुर्यकांत शिंदे यांच्यासह बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव मा.भवरे, ह.भ.प.उद्धव महाराज भारती,शाहीर बळीराम जाधव सुजलेगांवकर,शाहीर रमेश नारलेवाड,शंकर गायकवाड,बापुराव जमधाडे,सुमेध एडके, शिवाजी डोखळे,अविनाश कदम, नागोराव मेंडेवाड,जळबा जळपते,परमेश्वर वालेगांवकर, केशव माने,सौ.सुरेखा रंगारी, बालाजी बोंडले आदींसह नांदेड जिल्ह्य़ातील शेकडो लोकपारंपारिक कलावंत आपल्या लोकपारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते.
दरम्यान या आंदोलनाला आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँड जगजीवन भेदे, भिमशक्तीचे शत्रुघ्न वाघमारे आदींसह अनेक सामाजिक,राजकीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भेटून पाठींबा दिला.

Google Ad