आंदोलन समाजाच्या हितासाठी करा, स्वतःच्या राजकारणासाठी नाही!आदिवासी महादेव कोळी जमातीच्या लढ्यातील समाजसेवक गणेश अंकुशराव यांचे शरद कोळी यांना आवाहन

पंढरपूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून सोलापूर मध्ये शिवसेना उपनेते शरद कोळी यांचे आदिवासी महादेव कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी उपोषण सुरु आहे. यावर पंढरपूर मधील आदिवासी महादेव कोळी जमातीचे समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी प्रतिक्रिया देताना शरद कोळी यांना आवाहन केले आहे.

शरद कोळी यांना खरंच समाजाबाबत तळमळ असेल तर त्यांनी स्वत:च्या संघटनेच्या नावाखाली आंदोलन न करता समस्त आदिवासी कोळी जमातीच्या नावाखाली करावं. सारखं मिडीयासमोर स्वतः न जाता उपोषणाला बसलेल्या इतर समाज बांधवांना ही बोलु द्यावं. आदिवासी महादेव कोळी जमातीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून समाजाची राखरांगोळी करण्यासाठी जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढेच विरोधक सुध्दा जबाबदार आहेत. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी विरोधी पक्षातले सर्व नेते भेट देतात परंतु आमच्या समाजबांधवांच्या सोलापूर मधील उपोषणस्थळी भेट देत नाहीत. नाना पटोले, शरद पवार, उध्दव ठाकरे, संजय राऊत यांना शरद कोळी यांनी सोलापुरातील आदिवासी कोळी जमातीच्या आंदोलन स्थळी भेट देण्यास बोलवावं. असं आवाहन यावेळी बोलताना गणेश अंकुशराव यांनी शरद कोळी यांना केलं आहे.

पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटात आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचा प्रश्न रखडलेला आहे.
आमच्या आदिवासी महादेव कोळी जमातीच्या जातीचे दाखले वैधते साठीचा प्रश्न सुटत नाही. एका भावाला जातवैधता प्रमाणपत्र मिळतं पण त्याच्याच सख्ख्या भावाला मिळत नाही. हा कुठला न्याय? याबाबत सत्ताधारी व विरोधकही मुग गिळून गप्प बसले आहेत. आमच्या समाजाचा वापर या सर्वांनीच मतापुरता केला आहे. असंही गणेश अंकुशराव म्हणाले.

शरद कोळी हे‌ शिवसेनेचे उपनेते असल्याने ते फक्त सत्ताधारी मंडळींना टार्गेट करुन वारंवार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व नारायण राणे यांच्यावर टीका करतात. परंतु त्यांच्या पक्षाचे नेते उध्दव ठाकरे, सौजन्य राऊत व महाविकास आघाडीतील शरद पवार, नाना पटोले या नेत्यांनी आदिवासी महादेव कोळी जमातीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबाबत चक्कार शब्द बोलत नाहीत. यावरूनच शरद कोळी हे समाजाच्या भावनांशी खेळुन आपल्या राजकारणाची पोळी भाजण्याचं पाप करत आहेत हे सिध्द होतंय. आमच्या पंढरपुरातील अनेक कोळी बांधवांचा चंद्रभागेच्या पात्रात होडी चालवण्याचा व्यवसाय आहे. भक्त पुंडलिक व चंद्रभागा त्यामुळे हे आम्हा कोळी समाजाचं वंदनीय स्थान आहे. त्यामुळे मी चंद्रभागेचं पात्र स्वच्छ रहावं म्हणून अनेक आंदोलने केली. यावर शरद कोळी माझं आंदोलन चंद्रभागेपुरतं म्हणुन टीका करत असतील तर त्यांचं असं वागणं बाळबोध आहे.

मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आदिवासी महादेव कोळी जमातीच्या प्रश्नांसाठी झगडतोय. अनेकांना आदिवासी महादेव कोळी जमातीचे दाखले मिळवून देण्यासाठी मी विविध आंदोलनं केली आहेत. कोळी समाजाचं भुषण असलेले आद्यकवी महर्षी वाल्मिकी असो अथवा आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे असो या महान आदरस्थानांची महती आपल्या समाजातील युवा पिढीला कळावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून मी लढतोय. हे करताना कधीच मी कोणत्या राजकीय नेत्याच्या वळचणीला गेलो नाही. जे काही आंदोलन केले ते निर्भीडपणे आणि नि:पक्षपणे केले. समाजातील सर्वसामान्य तरुणांना सोबत घेऊन केले. त्यामुळे शरद कोळी यांनी आमच्यावर टीका करताना आमच्या कामाचा इतिहास आधी तपासावा. आणि पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो की , आदिवासी कोळी जमातीच्या प्रश्नांसाठी आंदोलन करायचं असेल तर ते तुमच्या संघटनेचं लेबल लावून नाही तर सकल आदिवासी महादेव कोळी जमात या लेबलखाली करा. आम्हीच काय संपुर्ण आदिवासी महादेव कोळी जमात तुमच्या सोबत असेल. असे मत गणेश अंकुशराव यांनी स्पष्ट केले आहे.
…………………………..‌‌…..
मा. संपादक, पत्रकार साहेब,
सप्रेम नमस्कार, कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय, दैनिक, साप्ताहिक, युट्यूब न्युज चॅनल, वेब पोर्टल वर प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. – आपला विश्वासू, गणेश अंकुशराव मोबाईल 9370271730

Google Ad