डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या महिला अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडल्या; १५ हजारांची रक्कम स्वीकारताना सापळा कारवाई यशस्वी

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), नांदेडच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता मधुकरराव पोहरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आज, दिनांक ३ जुलै रोजी समाज कल्याण कार्यालय परिसरात पोहरे यांच्या कक्षात सापळा कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदाराने आपल्या मुलाच्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी १३ मार्च २०२५ रोजी ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज सादर केला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव अर्ज नामंजूर करण्यात आला. पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर तक्रारदाराने प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांची भेट घेतली. पोहरे यांनी जात पडताळणी विभागाशी आपली ओळख असल्याचे सांगून, “तुमचे काम करून देते, पण पैसे भरावे लागतील,” अशी लाचेची मागणी केली होती.
सुरुवातीला २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र अखेर सौदा १५ हजार रुपयांवर ठरला. तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर आज सापळा कारवाई राबविण्यात आली. पंचासमक्ष पोहरे यांनी १५ हजारांची रक्कम स्वीकारली. त्यानंतर ACB पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ५० हजार रुपये नगद सापडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक करीम खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मेनका पवार, यशवंत दाबनवाड, ईश्वर जाधव, आणि रमेश नामपल्ली यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
गत काही आठवड्यांत ACB विभागाने सातत्याने भ्रष्टाचारविरोधात धडक कारवाया करत लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली आहे. दोन महिला तलाठ्यांनंतर आता जिल्हा प्रकल्प अधिकारी पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्याला जाळ्यात पकडल्याने समाजकल्याण विभागातही भ्रष्टाचाराचे बुरुज कोसळू लागल्याचे चित्र आहे. महिलादेखील लाचखोरीत मागे नाहीत, अशी चर्चाही सध्या रंगत आहे.