मीटर बंद असताना 55 हजारांहून अधिक वीजबिल आंदेगावातील गरीब महिलेवर महावितरणचा ढिसाळ कारभार उघड
हिमायतनगर (जि. नांदेड) | प्रतिनिधी – महाराष्ट्र जीवन न्यूज
महावितरणच्या गलथान आणि बेजबाबदार कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे उघडकीस आला असून, मीटर बंद (Faulty) असतानाही एका गरीब महिलेला तब्बल 55 हजार रुपयांहून अधिकचे वीजबिल पाठवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आंदेगाव येथील सविता विश्वनाथ उपलवाड या गरीब महिला ग्राहक असून त्यांचा वीजमीटर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. असे असतानाही महावितरणकडून जानेवारी 2026 चे ₹55,300/- इतके प्रचंड वीजबिल देण्यात आले आहे. विशेष म्हणजे बिलावरच Meter Status : Faulty असा स्पष्ट उल्लेख असतानाही इतका अवाजवी वीज वापर दाखवण्यात आला आहे.
मीटर बंद असल्यामुळे प्रत्यक्षात वीज वापर होत नसताना मागील रीडिंगच्या अंदाजावर (Average Billing) किंवा चुकीच्या पद्धतीने बिल आकारण्यात आल्याचा आरोप होत आहे. उपलवाड कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून एवढी मोठी रक्कम भरणे त्यांना अशक्य आहे.
या संदर्भात संबंधित महिलेनं महावितरण कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलट बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस दिल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
गरीब ग्राहकांना वेठीस धरून चुकीची बिले देणे, वेळेवर मीटर दुरुस्ती न करणे, तक्रारींकडे दुर्लक्ष करणे हा महावितरणचा नेहमीचाच अनुभव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सदर बिल रद्द करावे, मीटरची तांत्रिक तपासणी करून योग्य बिल आकारावे आणि गरीब महिलेला न्याय द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून होत आहे.
