भोकर नगरपरिषदेत तज्ज्ञ,उच्च शिक्षित स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करावी – माधव मेकेवाड यांची मागणी.

भोकर (प्रतिनिधी): महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व नगरविकास विभागाच्या नवीन अध्यादेशानुसार नगरपरिषदेमध्ये एकूण नगरसेवकांच्या १० टक्के जागांवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व अभ्यासू व्यक्तींना स्वीकृत (नॉमिनेटेड) नगरसेवक म्हणून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भोकर नगरपरिषदेत तज्ज्ञ व निष्कलंक व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माधव नरसिंग मेकेवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मेकेवाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, या तरतुदीमागील उद्देश राजकीय ओळखी, नातेवाईक किंवा हितसंबंधीय व्यक्तींना नियुक्ती देण्यास प्रतिबंध करणे हा आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी डॉक्टर, वकील, अभियंते, प्राध्यापक, विधी तज्ज्ञ तसेच पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तींना संधी देण्यात यावी.
सध्या भोकर नगरपरिषद मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी असून अनेक कोटी रुपयांची कामे रद्द झालेली आहेत. आगामी काळात नगरपरिषदेचा दैनंदिन कारभार, कर्मचाऱ्यांचे वेतन व विकासकामांसाठी निधी उभारणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
माधव मेकेवाड हे विधी शिक्षण घेत असून श्री मार्कंडेय ऋषी युवाशक्ती सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. भोकर शहराचा नियोजनबद्ध विकास करून पुढील पाच वर्षांत नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच केवळ राजकीय शिफारशीवर, आर्थिक बळावर किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक पद देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. शासन आदेश व निकषांचा भंग झाल्यास न्यायालयीन मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Leave a Reply