अवैध रेती तस्करीवर भोकर महसूल प्रशासनाचा कडक प्रहार; वाळू माफियांमध्ये भीतीचे सावट

डांगे, दंतुलवाड, कसेवाड, मेतलवाड यांच्या गस्तीने वाळू माफियांचे धाबे दणाणले

भोकर – तालुक्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीवर भोकर महसूल प्रशासनाने जोरदार गस्त घालत मोठ्या कारवाईसाठी सज्ज असून वाळू माफियांना जबर धक्का दिला आहे. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे परिसरातील अवैध रेती व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

नायब तहसीलदार काशिनाथ डांगे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी सतीश दंतुलवाड, ग्राम महसूल अधिकारी गौराजी कसेवाड तसेच माधव मेतलवाड येथील तलाठी यांनी संयुक्त पथक तयार करून रात्री उशिरापर्यंत गस्त घातली. अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाने करडी नजर ठेवत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी आणि तहसीलदार विनोद गुंडमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर महसूल विभागाने अवैध रेती उत्खनना विरोधात कंबर कसली आहे. अवैध व्यवसायाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा ठाम इशारा प्रशासनाने दिला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेती तस्करीबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या तसेच वृत्तपत्रांतूनही या प्रकारांचा पर्दाफाश होत होता. त्या पार्श्वभूमीवर ही विशेष गस्त मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भोकर महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती व्यवसायावर निश्चितच आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महसुल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.