नांदेड हादरले! १० हजार रुपयांसाठी तरुणाला बेदम मारहाण, PSI ने तोंडावर लघवी केल्याचा धक्कादायक आरोप
नांदेड : रक्षकच भक्षक बनल्याची एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथून समोर आली आहे. किरकोळ वादातून पोलीस ठाण्यात आणलेल्या तरुणाकडे लाचेची मागणी करत, ती पूर्ण न केल्याने पोलीस उपनिरीक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर या अधिकाऱ्याने तरुणाच्या तोंडावर लघवी केल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना हदगाव पोलीस ठाण्यात घडली आहे. १४ फेब्रुवारी रोजी हदगाव तालुक्यातील लहरी गावात नामविस्तार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान दोन गटांत किरकोळ वाद झाला आणि त्यातून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ फेब्रुवारीला हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) नंद हे लहरी गावात पोहोचले. त्यांनी गावातील अक्षय कांबळे आणि इतर चार तरुणांना ताब्यात घेतले. या तरुणांना गाडीत बसवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले, मात्र त्यांना ताब्यात घेण्याचे कोणतेही ठोस कारण दिले गेले नाही.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पीएसआय नंद यांनी या पाचही तरुणांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेऊन अमानुष मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. अक्षय कांबळे याने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यातील ज्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा ठिकाणी नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पीएसआय नंद यांनी या तरुणांकडे प्रत्येकी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. “पैसे दिले नाहीत तर ३ महिने जामीन होऊ देणार नाही,” अशी धमकीही त्यांनी दिली.
यादरम्यान पीएसआय नंद यांनी क्रुरतेची परिसीमा गाठत अक्षय कांबळे याला एका खोलीत नेले, त्याला पुन्हा मारहाण केली आणि त्याच्या तोंडावर लघवी केल्याचा गंभीर आरोप अक्षयने केला आहे. या अमानुष छळानंतर भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत जोरदार निदर्शने केली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेमुळे खाकी वर्दीतील काही अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) आहे. फोटोच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
