लावणी महोत्सवाच्या पायात रुतला बाई काटा !शिवजयंतीमुळे लावणी महोत्सव रद्द करण्याची नगरसेवक साई जटालवार यांची मागणी
भोकर भोकर येथील ग्रामदैवत महादेवांच्या यात्रेनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या लावणी महोत्सवावर वाद निर्माण झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी असा कार्यक्रम घेणे अयोग्य असल्याची भूमिका नगरसेवक साईप्रसाद जटालवार यांनी मांडली आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाकडे निवेदन देऊन लावणी महोत्सव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
१९ महादेव यात्रा समितीमार्फत फेब्रुवारी रोजी भोकर येथे रात्री ८ वाजता बहारदार लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकातून जाहीर करण्यात आले होते. मात्र, याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाची सुरुवातही या काळात होत असल्याने हा दिवस शिवप्रमींमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. अशा दिवशी लावणीसारखा मनोरंजनप्रधान कार्यक्रम आयोजित करणे योग्य नसल्याचे जटालवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. शिवजयंती हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमान आणि प्रेरणेचा दिवस आहे. या पवित्र दिवशी सांस्कृतिक परंपरेचा आदर राखत कार्यक्रमांचे स्वरूप सुसंगत असावे, अन्यथा शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सदर कार्यक्रम रद्द न केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सूचित केले असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या संदर्भात निवेदनाच्या प्रती अप्पर पोलीस अधीक्षक, व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पोलीस निरीक्षक भोकर यांच्या मार्फत देण्यात आले आहे. नगरसेवक ‘पाईप्रसाद जटलवार हे याप्रकरणी अस्वस्थ असून पोलीस प्रशासन याप्रकरणी गांभीर्याने घ्यावे असा इशारा दिला आहे. दरम्यान, या मागणीमुळे यात्रा समिती समोर मोठा पेच निर्माण झाला असून नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे.
