भोकर तहसिलदारांचे वाळू तस्करांशी संगनमताची चर्चा!

सामाजिक कार्यकर्ते सुभाष भालेराव यांच्या उपोषणानंतरही प्रशासन सुस्त
_______________________

९० ब्रास जप्त वाळूबाबत संभ्रम
​भोकर (प्रतिनिधी):
शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल वाचवण्यात भोकरचे तहसीलदार सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र असून, सध्या तालुक्यात वाळू माफियांना मोकळे रान मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष भालेराव यांनी तीन दिवस कडक उपोषण केल्यानंतर प्रशासनाने नावाला ‘गौण खनिज नियंत्रण पथक’ तर स्थापन केले, परंतु हे पथक केवळ ‘अर्थपूर्ण’ वसुलीत व्यस्त असल्याचा खळबळजनक आरोप आता नागरिक करत आहेत.

​जप्त केलेली ९० ब्रास वाळू गेली कुठे…?
____________________
​शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू साठा असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास ९० ब्रास वाळू जप्त करण्याची कारवाई कागदावर की प्रत्यक्षात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही जप्त केलेली वाळू अद्याप प्रशासकीय ताब्यात का घेतली गेली नाही? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही जप्त वाळू गरजू घरकुल लाभार्थ्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात वाटप करून त्यांना दिलासा दिला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तहसीलदारांचे ​कॉल रेकॉर्ड तपासल्यास ‘पितळ’ उघडे पडणार!
__________________

​तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असलेली बाब म्हणजे तहसीलदारांचे वाळू तस्करांसोबत असलेले कथित साटेलोटे. महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वाळू तस्करांशी थेट धागेदोरे असल्याचे बोलले जात आहे.
वाळू तस्कर रात्री कितीही वाजता कॉल केल्यास एका बेल वर तहसीलदार कॉल घेतात ही माहिती समोर येत असताना जर संबंधित तहसीलदारांचे केवळ मागील दोन महिन्यांचे कॉल रेकॉर्ड (CDR) तपासले, तर ‘हप्तेखोरी’चे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​महसूल बुडवून कोणाचे खिसे भरले?
____________________

​शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूल हप्तेखोरीमुळे खासगी खिशात जात आहे. एकीकडे सामान्य माणूस घराच्या बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने त्रस्त आहे, तर दुसरीकडे प्रशासनाच्या आशीर्वादाने तस्कर मालामाल होत आहेत. पथक तयार करूनही जर कारवाई होत नसेल, तर हे पथक नक्की कोणासाठी काम करत आहे, असा संतप्त सवाल सुभाष भालेराव आणि स्थानिक नागरिकांनी विचारला आहे.
​”प्रशासनाने तातडीने जप्त वाळूवर कारवाई करून ती घरकुल धारकांना द्यावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
— सुभाष भालेराव, सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply