भोकरातील प्रलंबित प्रश्नांवरून समता विचार मंचचा इशारा; २३ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

भोकर (प्रतिनिधी ) भोकर शहरातील विविध प्रलंबित प्रश्न आणि जनहिताच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत समता विचार मंचच्या वतीने प्रशासनाला जाहीर इशारा देण्यात आला आहे. मंचाचे केशव मुद्देवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास २३ मार्च २०२६ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोकर समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
समता विचार मंचच्या वतीने प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली असतानाही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे आता लोकशाही मार्गाने आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागी सुशोभीकरण त्वरित करण्यात यावे, अन्यथा २३ मार्चपासून आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मंचाच्या वतीने भोकर शहराच्या जनहितार्थ १२ प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक आणि लहुजी वस्ताद साळवे चौक येथे संबंधित महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे उभारून परिसराचे सुशोभीकरण करणे, शहरातील गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या समतानगर, इंदिरानगर, शास्त्रीनगर, नंदीनगर, भीमटेकडी व फुलेनगर येथील नागरिकांना तहसीलमार्फत हक्क विलेख देणे, बौद्ध स्मशानभूमीला आवश्यक सुविधा देऊन संरक्षण भिंत उभारणे, तसेच समतानगर येथील बुद्धविहाराचे सुशोभीकरण करून भिक्खू निवास बांधण्याची मागणी करण्यात आली आहे या शिवाय समतानगर येथील हनुमान मंदिर परिसराचे सुशोभीकरण, मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून देणे, शहरातील प्रत्येक प्रभागात उर्दू अंगणवाडी सुरू करणे, उमरी मुख्य रस्त्यावर गुरुवारी भरत असलेला बेकायदेशीर बकरी बाजार हटवून त्यासाठी स्वतंत्र नियोजित जागा उपलब्ध करून देणे, बेघर नागरिकांना घरकुल मंजूर करणे तसेच ग्रामीण रुग्णालयात २४ तास सेवा आणि आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.दरम्यान, या मागण्यांवर २३ मार्च २०२६ पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा समता विचार मंचचे केशव राम मुद्देवाड (माजी नगरसेवक) यांनी दिला आहे.या आंदोलनात देवा हाटकर, सय्यद साजिद, साई निखाते आणि नरेश रॉपनवड यांसह समतानगर येथील कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply