नांदेड एलसीबीची धडक कारवाई : वाधी चौकात ‘डिलिव्हरी’पूर्वीच गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद; 61 हजारांचा मुद्देमाल जप्त..
नांदेड (प्रतिनिधी) : अवैध शस्त्रांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला गावठी पिस्टल व जिवंत काडतुसेसह ताब्यात घेतले. हस्सापूर रोडवरील वाधी चौक येथे विक्रीसाठी थांबलेल्या संशयितावर सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीकडून एक गावठी पिस्टल व १८ जिवंत काडतुसे असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२८/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम ३/२५, ७/२५ कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत नागेंद्र ऊर्फ दत्ता श्रीहारी भारती (वय २२, रा. जिंदमनगर, गोपाळचावडी, नांदेड) यास अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू आहे. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी विशेष पथक तयार केले होते.
२५ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाने वजीराबाद हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम गावठी पिस्टल विक्रीसाठी वाधी चौक परिसरात थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल (किंमत अंदाजे २५ हजार रुपये) व १८ जिवंत काडतुसे (किंमत अंदाजे ३६ हजार रुपये) असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
कारवाईनंतर आरोपीस पुढील तपासासाठी वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, पोहेकॉ सुनिल गटलेवार, श्रीराम दासरे, माधव माने, संघरत्न गायकवाड, मनोज राठोड, सुधाकर देवकत्ते, महेश बडगु तसेच सायबर सेलचे राजू सिटीकर व दीपक ओढणे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
दरम्यान, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पथकाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
