भोसी कॅनॉलमधून भोकर येथील दोन युवक वाहून गेले.भोकर तालुक्यातील धक्कादायक घटना; शोधमोहीम सुरूच, प्रशासनावर नाराजी
भोकर : प्रतिनिधी
भोकर तालुक्यातील भोसी परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास दोन युवक कॅनॉलमध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दोन्ही युवकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.
शेख रिजवान शेख शादुल (वय १७ वर्षे) व नुमान बेग समीउल्ला बेग (वय १८ वर्षे) हे दोघेही शास्त्रीनगर, भोकर येथील रहिवासी असून ते भोसी येथील कॅनॉलमध्ये पाणी पाहण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक आलेल्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे ते दोघेही वाहून गेले. कॅनॉलमधील पाण्याचा वेग अत्यंत जास्त असल्याने त्यांना बाहेर पडण्यास संधीच मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही युवकांचा शोध लागलेला नव्हता.दरम्यान, सदर कॅनॉलमध्ये येणारे पाणी ईसापूर धरणातून सोडण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने सुरू असल्यामुळे शोधमोहीम अधिक कठीण बनली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वारंवार मागणी करूनही कॅनॉलमधील पाण्याचा वेग कमी करण्यात आलेला नाही.
जर वेळेवर पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला असता, तर युवकांचा शोध घेणे सुलभ झाले असते, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांकडून होत असून यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तातडीने आपत्ती व्यवस्थापन पथक पाठवून शोधमोहीम गतीमान करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.