भोसी कॅनॉल दुर्घटना : दोन युवक वाहून गेले; २४ तासांनंतरही शोध निष्फळ
भोसी कॅनॉल दुर्घटना : दोन युवक वाहून गेले; २४ तासांनंतरही शोध निष्फळ
भोकर : प्रतिनिधी भोकर तालुक्यातील भोसी परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन युवक कॅनॉलच्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, २४ तास उलटूनही दोघांचा शोध लागलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि चिंता व्यक्त होत आहे.शेख रिजवान शेख शादुल (वय १७ वर्षे) व नुमान बेग समीउल्ला बेग (वय १८ वर्षे), दोघेही शास्त्रीनगर, भोकर येथील रहिवासी असून, ते भोसी येथील कॅनॉलवर पाणी पाहण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक वाढलेल्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात ते दोघेही वाहून गेले. पाण्याचा वेग अत्यंत जास्त असल्याने त्यांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधार पडल्यामुळे आणि पाण्याचा प्रचंड वेग असल्याने शोधकार्याला अडथळे आले. दुसऱ्या दिवशीही सकाळपासून शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली, परंतु दुपारी ४ वाजेपर्यंतही कोणताही ठोस सुगावा लागला नाही.दरम्यान, संबंधित कॅनॉलमध्ये पाणी ईसापूर धरणातून सोडण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने सुरू असल्याने शोधमोहीम अधिकच कठीण बनली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार मागणी करूनही पाण्याचा वेग कमी करण्यात आलेला नसल्याने प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि कर्तव्यदक्ष तहसीलदार यांच्या पुढाकारातून जीव रक्षक पथकाचे तीन सदस्य घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी सुमारे आठ किलोमीटरपर्यंत कॅनॉल परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र त्यात यश आले नाही.
दरम्यान, या घटनेने संबंधित कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. रिजवान शेख शादुल याचा मोठा भाऊ शाहरुख शेख हा यापूर्वीच एका अपघातात गंभीर जखमी होऊन संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील आणखी एक सदस्य कॅनॉलमध्ये वाहून गेल्याने संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विशेष म्हणजे, रिजवान आणि नुमान हे सख्ख्या मामाची मुले असल्याने दोन्ही कुटुंबांवर एकाच वेळी मोठे संकट ओढवले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तातडीने आपत्ती व्यवस्थापन पथक पाठवून शोधमोहीम अधिक वेगाने राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अजित कुंभार (पोलीस निरीक्षक, भोकर), राजेश घुन्नर (पोलीस कर्मचारी), पंकज हनवते (पोलीस कॉन्स्टेबल), दीपक कंधारे (पोलीस कर्मचारी), प्रवीण होंडे (तलाठी, भोसी सज्जा), मारोती मगरे (मंडळ अधिकारी, भोसी),जुनेद पटेल (सामाजिक कार्यकर्ते), केशव मुद्देवाड (माजी नगरसेवक), माधव मेकेवाड (सामाजिक कार्यकर्ते), शेख रज्जाक(सा.कार्यकर्ता),संग्राम वाघमारे(पो.मित्र,संघटना म.अध्यक्ष),शेख हबीब शेख अखिल (अध्यक्ष, गोवर्धन घाट जीव रक्षक संघटना), मोहंमद सलीम मोहम्मद युनुस (जीव रक्षक पथक सदस्य), शेख जुबेर (जीव रक्षक पथक सदस्य) आदी जण उपस्थित होते.
