भोकरच्या ‘शाहू’कडून देशाला अनोखी मानवंदना देशातील सर्वाधिक लांबीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रध्वजासह ‘तिरंगा रॅलीचे’ आयोजन

भोकर: दि ९ ऑगस्ट.येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे सातत्याने आपल्या आगळ्यावेगळ्या नवोपक्रमांसाठी सुप्रसिद्ध आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘शाहू परिवाराकडून’ भोकरकरांना राष्ट्रभक्तीची एक अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. यासाठी शाहू परिवार सज्ज असून शाहूचे सुमारे तीन हजार विद्यार्थी या तिरंगा रॅलीत सहभागी होणार आहेत.यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १४ ऑगस्टला सकाळी १०:३० वाजता ही तिरंगा रॅली शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून निघून भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी वंदन करून मूख्य रस्त्याने पुन्हा परत जाईल. श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिरिष भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते तिरंगा रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात होईल. विशेष आकर्षण म्हणजे या रॅलीसाठी सुमारे एक हजार मिटर लांबीचा राष्ट्रध्वज तयार केला जात आहे. देशातील आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीचा राष्ट्रध्वज असणार आहे. यापूर्वी सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा राष्ट्रध्वज एका रॅलीत वापरला गेला. ‘शाहू परिवाराकडून’ तयार केला जाणारा ‘तिरंगा’ एक हजार मिटर लांबीचा असेल.

केवळ ‘शाहू परिवारा’मुळेच देशप्रेमाने ओथंबलेला हा क्षण आणि सोहळा अनुभवण्याची सुवर्णसंधी भोकरकरांना लाभणार आहे, असे सर्वत्र बोलले जात आहे.