माहिती अधिकार संरक्षण समितीच्या भोकर तालुकाध्यक्षपदी साहेबराव गोरठेकर यांची नियुक्ती
भोकर (प्रतिनिधी) :पारदर्शकता, जबाबदारी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या तत्वांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी झटणाऱ्या माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, जिल्हा नांदेड यांच्या वतीने सोमठाणा (ता. भोकर) येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते श्री. साहेबराव बाबा गोरठेकर यांची भोकर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या विशेष कार्यक्रमात या निवडीचे पत्रक श्री. गोरठेकर यांना प्रदान करण्यात आले. या वेळी मा. शेख जाकेर शेख सगिर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, मा. सुनिलभाऊ कांबळे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच प्रविण कानघुले जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य ही संस्था २००५ पासून सातत्याने कार्यरत असून शासन व प्रशासनामध्ये पारदर्शकता आणणे, नागरिकांच्या समस्या शासन दरबारी पोहोचवणे, तसेच जनसामान्यांना माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देणे हे या संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. या समितीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत.
श्री. साहेबराव गोरठेकर हे समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेले एक जिज्ञासू व लढवय्ये व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भोकर तालुक्यात समितीची ताकद वाढून माहिती अधिकार संरक्षण समितीची कार्ये अधिक प्रभावी व परिणामकारक पद्धतीने राबवली जातील, असा विश्वास समितीचे पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गोरठेकर यांच्या कार्याचा गौरव करत, “माहिती अधिकार हा सामान्य माणसाचे हक्काचे शस्त्र असून, त्याचा योग्य वापर होण्यासाठी तालुका स्तरावर जबाबदार नेतृत्वाची गरज आहे. ही गरज साहेबराव गोरठेकर यांच्या रूपाने पूर्ण झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली भोकर तालुका अधिक जागरूक, सजग व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या दिशेने वाटचाल करेल,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
साहेबराव गोरठेकर यांनी आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि माहिती अधिकार कायद्याच्या जनजागृतीसाठी मी झटत राहीन. समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना शासनाचे कामकाज पारदर्शक करण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे प्रतिपादन केले. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत असून, तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
