नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अंतरराज्य मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश; ४ गुन्हे उघड, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. १९ मार्च २०२६ (प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत अंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पल्सर कंपनीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये आहे. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सरज गुरव यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानुसार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील विविध भागात गुप्त माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले होते.दरम्यान, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, धर्माबाद येथील बन्नाळी चौक परिसरात एक आरोपी चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अत्यंत शिताफीने संबंधित इसमास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शेख इम्रान उर्फ अबू शूटर उर्फ डॉन उर्फ समीर (वय २२, रा. रामनगर, धर्माबाद, सध्या निजामाबाद – तेलंगणा) असे सांगितले.
सखोल चौकशी केली असता आरोपीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, मुखेड, कुंडर व बिलोली या भागांतून पल्सर कंपनीच्या मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मोटारसायकली लगेच विक्री न करता त्या पोलिसांच्या नजरेतून दूर राहाव्यात यासाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या मागील जंगल परिसरात लपवून ठेवण्यात येत असल्याची माहितीही त्याने दिली. आरोपीच्या दाखल्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चार मोटारसायकली जप्त केल्या.या गुन्ह्यात शेख अरवाज उर्फ माया व शेख अरबाज उर्फ गांजावाला या आरोपींचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. मुख्य आरोपी शेख इम्रान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नांदेड जिल्ह्यात सुमारे १४ गुन्हे तर तेलंगणातील निजामाबाद येथे १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तो अनेक प्रकरणांमध्ये फरार होता.
या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार ,श्री.नागनाथ तुकडे,पोलीस उपनिरीक्षक ने स्थानिकगुन्हे शाखा, नांदेड पोलीस अंमलदार सपोउपनि दारासिंग राठोड, पोहेकॉ 664 मोहन हक्के, पोकॉ/395 लहु चाटे, पोकॉ/1039 आबाराव पिंगलवाड, पोकॉ/ 2668 महेश बडगु स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड सायबर सेल सिटीकर, ओढणे,यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या धाडसी आणि नियोजनबद्ध कामगिरीमुळे ही टोळी उघडकीस आली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन धर्माबाद यांच्या ताब्यात देण्यात आले असून या टोळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर गुन्ह्यांचा तपासही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply