चिक्कोडीत बापानेच केला पोटच्या मुलाचा खून; व्यसनाला कंटाळून आवळला गळा
बेळगाव/चिक्कोडी: दारूच्या व्यसनाला आणि रोजच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील इंदिरानगर भागात घडली आहे. विशेष म्हणजे, मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव आरोपींनी रचला होता, मात्र मृताच्या मित्रांच्या सतर्कतेमुळे या खुनाचा उलगडा झाला.नेमकी घटना काय? किरण उर्फ बाळासाहेब आलुरे (वय ३१, रा. इंदिरानगर, चिक्कोडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. किरणला दारूचे प्रचंड व्यसन होते आणि त्यातून तो घरच्यांना त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून त्याचे वडील निजगुणी आलुरे यांनी आपला मित्र आणि हॉटेल मालक उस्मान मुल्ला याच्या मदतीने किरणचा काटा काढण्याचे ठरवले.सोमवारी दुपारी आरोपींनी किरणचा वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर हा मृत्यू नैसर्गिक वाटावा किंवा हृदयविकाराने झाला असावा, असा बनाव रचून त्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची तयारी सुरू केली.मित्रांमुळे फुटले बिंग किरणचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे वडिलांनी सांगितल्यावर त्याच्या काही मित्रांना संशय आला. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, किरणच्या गळ्यावर वळ आणि कानातून रक्त आल्याचे दिसून आले. मित्रांनी तातडीने याबाबत जाब विचारला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली.
पोलिसांत गुन्हा दाखल पोलिसी खाक्या दाखवताच वडील निजगुणी आलुरे यांनी गुन्ह्याची कबुली दिली. “मुलाच्या व्यसनाला आणि त्रासाला आम्ही कंटाळलो होतो, त्यामुळेच हॉटेल मालक उस्मान मुल्ला याच्या मदतीने त्याचा गळा आवळून खून केला,” असे त्यांनी तपासात सांगितले.
या प्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात निजगुणी आलुरे आणि उस्मान मुल्ला यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
