आदिवासींची नवाय पूजा पद्धत-प्रा.मोतीलाल सोनवणे

आदिवासी कोळी, ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव,डोंगर कोळी, कोळी मल्हार, भिल्ल ठाकूर, वारली, कातकरी अशा ४७ जमाती आदिवासींमध्ये मोडतात. हे आदिवासी नव्या पिकाची पूजा करतात. नवीन पिके येऊ लागली की घरी आणण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी नवाय -नव्या पिकाची पूजा करतात. परंपरागत या उपक्रमाला आदिवासी लोक नवाय पूजा किंवा नवीन पिकनी पूजा असे म्हणतात.आदिवासी जमाती इतर समाजापेक्षा भिन्न आहे. आदिवासींची संस्कृती प्राचीन आहे. सण उत्सव हे सुद्धा वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. त्यांच्या दैवत कथा शास्त्राच्या आधारे विचार केला तर ते पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) पूर्वज प्राणी वनस्पती या देवताही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. स्वतःच्या शेतात नवीन उत्पादित केलेले धान्य, फळे,भाजीपाला आदी घरात आणायचे असेल किंवा खायचे असेल तर आदी त्याची पूजा करावी लागते.नंतर घरातील प्रमुख व्यक्ती स्वतःच्या शेतात उत्पादित केलेले धान्य फळे भाजीपाला खायला सुरुवात करतात.नवाय पूजा करण्यासाठी विशेष म्हणजे ठराविक व्यक्तीची आवश्यकता असते. पूजा करीत असताना संबंधित भगताला देव देवतांची नावे घ्यावी लागतात. घरातील, गावातील, पाड्यातील नातेवाईकांच्या घरातील मृत झालेल्या व्यक्तींच्या स्मरण करावे लागते.चिमुटभर मका, काकडी धान्य दिले जाते. पूजा करताना तंबाखू, डाळ एकत्र ठेवून तांब्यात पाणी घेऊन ते फिरवले जाते. डोंगर देव म्हणून डोंगऱ्या देवाची पूजा करतात. उदा.अजूबा डोंगर हा ध्यानस्थ बसलेला वाल्मिकी आहे व आपण वाल्याचे कोळी आहोत ही आदिवासी कोळी जमातीची भावना उल्लेखनीय आहे. हे आदिवासी नव्याचा सण, कोवळीचा सण, उजाडे देव उर्फ मोरीमाता, निळीचारी, दीप अमावश्या, गिबा देव, गाव दिवाळी इत्यादी सण साजरा करतात.*