सेवा समर्पण परिवार चा आदर्श सर्वानी घ्यावा – डॉ श्रीपाल सबनीस
Adiwasi kranti Marathi news
भोकर, पुढारी वृत्तसेवा : राजकारण व समाजकारण स्वार्थासाठी केले जात आहे. लोकशाहीचा गळा आवळ्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाचे राजकारण व समाजकारण वेगळ्या वाटेने जात असताना भोकर येथील सेवा समर्पण परिवार ने महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे. या कार्याची दखल राज्य सरकारने घ्यावी असे प्रतिपादन ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले
सेवा समर्पण परिवार या सेवाभावी संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि. २ एप्रिल रोजी एड्स ग्रस्तांना आधार देणारे श्री व सौ. संध्याताई दत्ता बारगजे या समाजसेवी दांपत्यांना मराठवाडा स्तरीय समाजसेवा आणि साहित्यिक आसाराम लोमटे यांना साहित्यसेवा पुरस्काराने येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले. यावेळी डॉ. सबनीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव राजेंद्र खंदारे, हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महंत उत्तमबन महाराज, प्राचार्य पंजाब चव्हाण, यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना सबनवीस म्हणाले वेदनेला जात नसते. मानवता व सत्याचा शोध घेतला पाहिजे विधायक कामे करा, ध्येय गाठण्यासाठी वेड व्हावं लागतं बाबा आमटेंचा अंश बारगजे दाम्पत्यामध्ये आहे. त्यांच्या कार्याचं कौतुक शब्दात करता येणार नाही, सेवा समर्पण धनुष्य आहे. त्यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. साहित्यिक आसाराम लोमटे यांनी शब्दांनी वेदना कमी व्हावी ,स्वप्न आणि वास्तव यातील अंतर कमी व्हावे असा आशावाद व्यक्त करून सेवा समर्पण लोकांच्या हितासाठी काम करत आहे याबदल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रारंभी तलावात बुडून मरण पावलेले तलाठी नरेंद्र वसंतराव मुडगुलवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. या कार्यक्रमास माजी जि. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर ,नामदेव आयलवाड, माधव अमृतवाड, डॉ. यु एल. जाधव, आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविकात सेवा समर्पण परिवारचे अध्यक्ष राजेश्वर लोकावाड यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. मिरा जोशी यांनी तर आभार विठ्ठल फुलारी यांनी मानले. यावेळी भोकर मेडीकल असोसिएशनच्या वतीने बारगजे दाम्पत्यास ८५ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला.
चौकटीसाठी
माझी लेकरं आजही शाळाबाह्य – दत्ता बारगजे
भोकर : बाबा आमटे यांच्या परिसस्पर्शाने प्रेरणा घेऊन एड्स ग्रस्तांच्या लेकरांसाठी आनंदग्राम आश्रम सुरु केले आहे. १९ वर्षांपासून सुरू असलेल्या कार्याला शासनाचे अनुदान मिळाले नाही. लोकसहभागावरच आश्रमातील लेकरांची कपड्यांची व पोटाची भूक भागविण्यात येत आहे. मात्र त्या मुलांना अद्यापही शाळेत प्रवेश मिळाला नसल्यामुळे शाळाबाह्य असून, शिक्षणापासून वंचित असल्याची सल माझ्या मनात आहे. असे भावनिक उद्गार दत्ता बारगजे यांनी येथे व्यक्त केले.