विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसुधारणा मंडळ सावरखार तर्फे सेझच्या गेटसमोर आमरण उपोषण.
Adiwasi kranti Marathi news portal
उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील जेएनपीए न्हावा शेवा बिजनेस पार्क (डि. पी वर्ल्ड ) सेझ कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात व सावरखार ग्रामस्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसुधारणा मंडळ सावरखार तर्फे सोमवार दि 12 जून 2023 पासून सेझच्या गेटसमोर सकाळी 10 वाजल्या पासून आमरण उपोषणला सुरवात करण्यात आली आहे . उरण तालुक्यातील सावरखारच्या जमिनी जेएनपीए, न्हावा शेवा बिजनेस पार्क ( डि. पी वर्ल्ड) सेझच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात संपादित झाली आहेत.70 टक्केहुन जमिनी या सावरखार ग्रामस्थांच्या प्रकल्पासाठी संपादित झाले आहेत.स्थानिक भूमीपुत्रांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पाला कवडीमोल भावाने शेतकऱ्यांनी विकल्या आहेत. जमीन संपादनावेळी प्रकल्पग्रस्तांना स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीवर घेण्याचे आश्वासन सेझ प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना, स्थानिक भूमीपुत्रांना दिले होते. मात्र स्थानिक भूमीपुत्रांना,प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले नाही. परप्रांतीयांची भरती करून स्थानिक भूमीपुत्रांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सेझने केले आहे. सावरखार ग्रामस्थांना कोणत्याही निर्णयात विश्वासात घेत नसल्याने तसेच सेझ प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही सावरखार ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होत नसल्याने शेवटी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामसुधारणा मंडळ सावरखारच्या पुढाकाराने जेएनपीए,न्हावा शेवा बिजनेस पार्क (डि. पी.वर्ल्ड) सेझ यांच्या विरोधात आमरण उपोषण पुकारले आहे या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जेएनपीएचे विद्यमान विश्वस्त रवि पाटील,जेएनपीएचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका सरचिटणीस विकास नाईक, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, कामगार नेते रोशन ठाकूर आदिंनी या उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी आपला जाहिर पाठिंबा व्यक्त करून जर सावरखार ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर सेझ प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा ईशारा दिला. स्थानीक भूमीपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत त्वरीत सामावून घ्यावे अन्यथा प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असा आक्रमक पवित्रा महेंद्र घरत यांनी घेतला. प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमीपुत्र यांना न्याय मिळावा यासाठी सर्व ग्रामस्थांच्या पाठीशी शेवटपर्यंत असल्याचे महेंद्र घरत यांनी यावेळी सांगितले.जेएनपीएचे विद्यमान विश्वस्त रवि पाटील, माजी विश्वस्त भूषण पाटील , पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर,कामगार नेते रोशन ठाकूर यांनीही आपली भूमिका स्पष्ट करून उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. या आमरण उपोषणाला सावरखार ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष अनिल घरत,उपाध्यक्ष गणेश घरत,सेक्रेटरी -परेश ठाकूर, खजिनदार नितीन घरत, ऑडिटर -हर्षद ठाकूर,करळ सावरखार ग्रुप ग्रामपंचायत सरपंच अनिता तांडेल, ग्रामपंचायत सदस्य रिंकू घरत, हर्षदा घरत, जितेंद्र घरत, माजी सरपंच चारुशीला ठाकूर,सावरखार ग्रामस्थ मोठया संख्येने आमरण उपोषणाला बसले होते.