जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती निमित्त पालखी सोहळा संपन्न.
उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील जुनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई या विद्यालयात 22 सप्टेंबर कर्मवीर जयंती रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ,पद्मभूषण, डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 136 वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, कामगार नेते सुरेश पाटील तसेच विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पुतळ्याचे पूजन केले. तसेच विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या थोर महापुरुषांच्या पुतळ्यांचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले गेले. विद्यालयाचे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस. यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पालखीचे पूजन केले.फुलांनी सजविलेल्या पालखीत कर्मवीरांची प्रतिमा ठेवून विद्यालयाच्या लेझीम व बँड पथकाच्या गजरात पालखीची मिरवणूक सर्व शिक्षक,विद्यार्थी यांच्या समवेत संपूर्ण जासई गावातून फिरली. यावेळी पालक व ग्रामस्थ यांनी कर्मवीरांच्या पालखीचे दर्शन घेतले तसेच सुवासिनींनी कर्मवीरांच्या पालखीला ओवाळणी केली.कर्मवीरांच्या जयघोषात पालखी शाळेच्या मैदानावर माघारी आली. या कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने जासई गावातील दानशूर व्यक्तिमत्व अमृत ठाकूर यांनी त्यांच्या पत्नी कै.सौ.ठाकूर यांच्या स्मरणार्थ विद्यालयातील गोर-गरीब व गरजू विद्यार्थ्यांना 3000 वह्यांचे वाटप केले. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत , सरपंच संतोष घरात, रघुनाथ पाटील ,यशवंत घरत ,अमृत ठाकूर , अविनाश पाटील,प्रभाकर मुंबईकर,जी.सी.घरत,मधुकर पाटील,धर्मदास घरत,पद्माकर घरत,महादेव म्हात्रे,शिक्षण प्रेमी नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख, प्रा. अतुल पाटील यांनी केले.