धुळे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय भ्रष्टाचाराचा- अड्डा-आयोगाकडे तक्रार.
आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत,वनसंरक्षण, पेसा भरती, आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मा.श्री अत्तरसिंग आर्या अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्ली व सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाने मंगळवार दिनांक १०/९/२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन सभागृह) धुळे येथे आयोजन करण्यात आले.धुळे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्यामुळे आदिवासी विकास संघाच्या वतीने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे लेखी व तोंडी तक्रार करण्यात आली. आदिवासी भिल, कोळी, ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार या आदिवासींना ब्रिटिश शासनाने मुंबई ॲक्ट (३)१९७४ च्या कायद्याप्रमाणे आदिवासी जागले, (व्हीलेज सर्वंट) म्हणून नेमणूक केल्या होत्या.मोबदला म्हणून त्यांना आदिवासी वारसा हक्काने हलके वतन म्हणजे इनाम वर्ग ६ ब देण्यात आले. तसेच नवीन अविभाज्य शर्त असे शेरे ७/१२ वर घेण्यात आले आहेत. या जमिनीची खरेदी विक्री होत नाही तरी आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन,आदिवासींना दारू पाजून, अंगठे टेकून, उच्चवर्णीय लोकांनी यांच्या जमिनी बळकावल्या आहेत त्या मूळ आदिवासींना परत कराव्यात. कोरोना काळात आदिवासींना चार हजार रुपये खावटी देण्यात आली.दोन हजार रोख व दोन हजाराचा किराणा होता.मंजूर झाल्यावर देखील बऱ्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.काहींना दोन हजार मिळाले पण किराणा मिळाला नाही. कोणाला किराणा मिळाला तर रोख पैसे मिळाले नाहीत.त्याची पूर्ण चौकशी करून सर्वांना लाभ देण्यात यावा.शबरी घरकुल मध्ये जे लाभार्थी आहेत त्यांचे प्रस्ताव धुळे प्रकल्प कार्यालयात प्रलंबित ठेवलेले आहेत.ते त्वरित मंजूर करावेत.आदिवासी शिकलेल्या मुलांची प्रकल्प कार्यालयात नाव नोंदणी करावी व त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासींसाठी जेवढ्या योजना राबवल्या जातात त्या सर्व योजना वरील आदिवासींना देण्यात याव्यात.या कार्यक्रमाला आयोगाचे अध्यक्ष आत्तरसिंग आर्या, जिल्हाधिकारी जितेंद्र जितेंद्र पापळकर,निवासी जिल्हाधिकारी नितीनजी गवांडे साहेब, पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेब, आमदार मंजुळा गावित, आमदार काशीराम पावरा, गोवर्धन मुंडे साहेब,अमृतलाल प्रजापती, संदीप गोलाईत साहेब,नामदेव केंद्रे तसेच आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व पदाधिकारी प्रा. मोतीलाल सोनवणे, संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, धुळे तालुका संपर्कप्रमुख दिलीप शिरसाठ, मधुकर सोनवणे, सुरेश काकुळदे, दगा चव्हाण, निंबा शिरसाठ, हिरा वाकडे, दिलीप बागुल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.