बहुजन क्रांतीचे प्रेरणास्थान – संत सेवालाल महाराज

बहुजन क्रांतीचे प्रेरणास्थान – संत सेवालाल महाराज
१५ फेब्रुवारी हा दिवस केवळ एका महापुरुषाचा जन्मदिन नाही; तो बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचा, स्वाभिमानाचा आणि सामाजिक क्रांतीचा दीपोत्सव आहे. हा दिवस म्हणजे संत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांच्या तेजस्वी विचारांचा, त्यांच्या त्यागमय जीवनाचा आणि समाजोद्धाराच्या महान कार्याचा स्मरणदिन आहे. हजारो वर्षांच्या अन्याय-अत्याचाराच्या अंधारात बहुजन समाजासाठी आशेचा दीप बनून उभे राहिलेले हे संत आजही आपल्या विचारांनी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरतात.
संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी झाला. त्या काळात समाजात जातिभेद, अंधश्रद्धा, असमानता आणि गुलामगिरीचे सावट दाटलेले होते. विशेषतः भटक्या-विमुक्त समाजावर सामाजिक बहिष्कार आणि उपेक्षेची काळी छाया होती. अशा कठीण परिस्थितीत सेवालाल महाराजांनी केवळ अध्यात्माचा मार्ग दाखवला नाही, तर सामाजिक जागृतीची क्रांतिकारी मशाल पेटवली. त्यांनी बहुजन समाजाला आत्मभान दिले, स्वाभिमानाची जाणीव करून दिली आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य दिले.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संतत्व, शौर्य, करुणा आणि सामाजिक क्रांतीचा अद्भुत संगम होता. ते केवळ धार्मिक गुरू नव्हते; ते एक समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी विचारवंत होते. त्यांनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, अन्याय आणि शोषण यांना ठाम विरोध केला. “सत्य, संयम आणि समता” हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. त्यांनी बहुजन समाजाला संघटित होण्याची प्रेरणा दिली आणि एकजुटीतून परिवर्तन घडविण्याची शक्ती ओळख करून दिली.
संत सेवालाल महाराज विज्ञाननिष्ठ विचारांचे पुरस्कर्ते होते. कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नये, तिची पडताळणी करूनच स्वीकार करावा, असा त्यांचा ठाम संदेश होता. त्या काळात जेंव्हा अंधश्रद्धा आणि अज्ञानाचे साम्राज्य होते, तेव्हा त्यांनी विवेकबुद्धीचा दीप प्रज्वलित केला. श्रद्धा असावी, पण ती विवेकाधिष्ठित असावी, असे ते सांगत. हीच त्यांची प्रगत आणि दूरदर्शी विचारसरणी होती.
त्यांच्या विचारांत पर्यावरण जागरूकतेचाही गाभा होता. पाण्याची महती त्यांनी विशेषत्वाने सांगितली. “भविष्यात एक रुपयाला कटोरा पाणी मिळेल,” असा इशारा त्यांनी त्या काळात दिला होता. आजच्या पाणीटंचाईच्या आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वचन किती दूरदर्शी होते, याची जाणीव होते. त्यांनी निसर्ग संपत्तीचा जप करण्याचा संदेश दिला. संसाधनांचा अपव्यय न करता त्यांचा जपून वापर करणे हीच खरी प्रगती, असे ते मानत.
भटक्या-विमुक्त समाजासाठी त्यांनी केलेले कार्य अमूल्य आहे. त्या काळी या समाजाला शिक्षण, आरोग्य, न्याय आणि सन्मान यांचा हक्क नव्हता. समाजातील उच्चवर्णीयांनी त्यांना तुच्छ लेखले. परंतु सेवालाल महाराजांनी या समाजाला आत्मविश्वास दिला. “आपण कुणापेक्षा कमी नाही. आपल्या कष्टात आणि प्रामाणिकपणातच आपला देव आहे,” असा आत्मसन्मानाचा मंत्र त्यांनी दिला. त्यांच्या या शब्दांनी हजारो लोकांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली.
त्यांच्या शिकवणीत मानवतावादाचा मूळ गाभा होता. त्यांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. जात-पात, धर्म-पंथ यांच्या भिंती त्यांनी नाकारल्या. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक मानव समान होता. म्हणूनच त्यांना “बहुजन उद्धारक” म्हणून गौरवले जाते. त्यांनी दुर्बल घटकांना न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले.
स्त्री-सन्मानाबाबतही त्यांची भूमिका अत्यंत प्रगत होती. त्या काळात स्त्रियांना शिक्षण आणि स्वातंत्र्याचा अधिकार नव्हता. त्यांनी स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून मान्यता दिली. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विचारांतून सामाजिक न्यायाची व्यापक जाणीव दिसून येते.
महाराष्ट्रातील पोहरादेवी हे संत सेवालाल महाराजांचे पवित्र स्थान मानले जाते. लाखो भाविक दरवर्षी तेथे उपस्थित राहतात.
भटक्या-विमुक्त समाजासाठी ते श्रद्धा, ऐक्य आणि प्रेरणेचे केंद्र आहे. परंतु केवळ यात्रेत सहभागी होणे पुरेसे नाही; त्यांच्या विचारांचे आचरण करणे हाच खरा सन्मान आहे.
आजच्या काळातही बहुजन समाज अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. शिक्षण, रोजगार, सामाजिक सन्मान, समान संधी या प्रश्नांवर अजूनही संघर्ष सुरू आहे. अशा वेळी संत सेवालाल महाराजांचे विचार अधिकच प्रासंगिक ठरतात. त्यांनी दिलेला स्वाभिमानाचा आणि विवेकाचा संदेश आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे.
त्यांच्या जीवनातून संघटनशक्तीचे महत्त्व स्पष्ट होते. “एकजुटीतच शक्ती आहे” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. शिक्षण, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, पर्यावरण-जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी यांच्या आधारावर समाजपरिवर्तन शक्य आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
संत सेवालाल महाराजांचे जीवन हे त्याग, धैर्य आणि निस्वार्थ सेवाभावाचे उदाहरण आहे. त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून समाजसेवा केली. अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी कधीही आपल्या ध्येयापासून माघार घेतली नाही. त्यांची चिकाटी आणि जिद्द आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
१५ फेब्रुवारीला जेंव्हा आपण त्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करतो, तेंव्हा तो केवळ परंपरेचा भाग म्हणून नसावा; तो परिवर्तनाचा संकल्प असावा. अंधश्रद्धा, अन्याय, भेदभाव आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्या विरोधात उभे राहण्याची प्रतिज्ञा करण्याचा दिवस असावा.
संत सेवालाल महाराजांनी दिलेला “मानवधर्म” हा संदेश सर्वांत श्रेष्ठ आहे. माणुसकी हीच खरी पूजा आणि समाजसेवा हीच खरी साधना, असे ते शिकवून गेले. त्यांच्या विचारांनी बहुजन समाजात आत्मसन्मानाची आणि विवेकाची जागृती केली.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा गौरव करतो; परंतु त्याचबरोबर त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शिक्षण, संघटन, विज्ञाननिष्ठता आणि स्वाभिमान या चार स्तंभांवर समाजाचे भवितव्य उभे राहील.
संत सेवालाल महाराज हे केवळ एका समाजाचे नव्हते; ते मानवतेचे दीपस्तंभ होते. त्यांनी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग दाखवला. त्यांच्या जयंतीचा उत्सव म्हणजे आत्मसन्मानाचा, समतेचा, विवेकाचा आणि क्रांतीचा उत्सव आहे.
१५ फेब्रुवारी हा प्रत्येक बहुजनासाठी अभिमानाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की संघर्षातूनच परिवर्तन जन्माला येते. संत सेवालाल महाराजांचा जयघोष करताना आपण त्यांच्या विचारांचे पालन करण्याची शपथ घेऊ या. विवेक, समता आणि मानवतेचा मार्ग स्वीकारू या.

शब्दलेख
पत्रकार डॉ. कैलास कानिंदे रेणापूरकर
समाजशास्त्र विभाग
श्री रेणुकादेवी महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूर जि. नांदेड