ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ची मोठी कारवाई; शस्त्रधारी चोरट्यांची टोळी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची धडक कारवाई; ६ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा – २.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड:-(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील वाढत्या मालमत्ताविरुद्धच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मोठी आणि धडक कारवाई करत शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल चोरी, जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून आरोपींकडून तब्बल २ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर आणि मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.उदय खंडेराय यांनी जिल्ह्यातील मालमत्ताविरुद्ध गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व स्था. गु. शा. नांदेड येथील मिलींद नरबाग, पोकॉ/ प्रमोद जोंधळे, पोकों/ इम्रान शेख, पोकों/संदीप घोगरे, पोकों/बालाजी कदम,चापोकों/अमोल घेवारे, पोकों/उमर शेख, पोकों/शेख अझहरोद्दीन, पोकॉ/ महेश बडगु,सायबर सेल नांदेड येथील पोहेकॉ/राजु सिटीकर, पोहेकॉ / दिपक ओढणे मपोको सिमा पठाण व त्यांच्या पथकाने तपास मोहीम सुरू केली.
दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी हातोडा चौक परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तीन संशयित इसम दोन विनानंबर मोटारसायकलींवर चोरीचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने आसना टी-पॉईंट ते तरोडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ज्वारी व हळदीच्या शेताजवळ थांबले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे सय्यद उमर सय्यद फारुख (वय २२, रा. लेबर कॉलनी, नांदेड), मोहम्मद एजाज ऊर्फ बॅनेट मोहम्मद अकबर (वय ३५, रा. इस्लामपुरा, नांदेड) आणि सय्यद अब्बु तलहा ऊर्फ तलहा पाटी सय्यद रहीम (वय २६, रा. मगदूम नगर, नांदेड) अशी सांगितली. त्यांच्या अंगझडतीत एक गावठी पिस्टल, लोखंडी खंजर, २.७ तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन, रोख ३५ हजार रुपये तसेच दोन मोटारसायकली असा एकूण २ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सखोल चौकशीत आरोपींनी मागील काही महिन्यांपासून नांदेड शहर व परिसरात गुन्हेगारी कारवाया केल्याची कबुली दिली. श्रीनगर येथून मोटारसायकल चोरी करून माळटेकडी पुलाजवळ एका जीपला अडवून खंजराच्या धाकावर प्रवाशांकडून सोन्याचे दागिने व मोबाईल जबरीने लुटल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच अंबिकानगर येथून दुसरी मोटारसायकल चोरी करून गणी कॉलनी येथे घरफोडी केली, तर हदगाव येथेही रात्रीच्या वेळी घरफोडी करून रोख रक्कम चोरल्याचे उघड झाले आहे.
अभिलेख तपासणीत पोलीस ठाणे विमानतळ, भाग्यनगर व हदगाव येथे संबंधित गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी संगनमताने एकत्रितपणे हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या इतर पाच साथीदारांचा शोध सुरू आहे.
आरोपींकडून विनापरवाना बेकायदेशीर गावठी पिस्टल जप्त झाल्याने पोलीस स्टेशन विमानतळ येथे गुन्हा क्रमांक 40/2026 अन्वये आर्म अॅक्ट कलम 3/25 अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी अटक करण्यात आली आहे.
