सावरकर जयंती अभिवादन कार्यक्रमाकडे भोकर नगर परिषद सत्ताधाऱ्यांची पाठ; हिंदुत्ववादाच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह
भोकर (प्रतिनिधी ) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषद कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमाकडे भोकर नगरपरिषदेतील सत्ताधारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. या कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक, अत्यंत काटेकोरपणे कायदेशीर प्रक्रिया राबवून नियुक्त करण्यात आलेले नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य तसेच मुख्याधिकारी यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली.
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त स्वतःच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमास गैरहजर राहणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या अनुपस्थितीतून भोकरवासीयांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी विचारवंत आणि आधुनिक हिंदुत्वाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. अशा महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमाबाबत उदासीनता दाखविणे हे लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेचे प्रतीक मानावे लागेल, अशी टीका विविध स्तरांतून होत आहे.
विशेष म्हणजे, स्वतःला हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनीच सावरकर जयंती अभिवादन कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक व्यासपीठांवर हिंदुत्वाच्या घोषणा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष कृती मात्र वेगळीच असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.दरम्यान, हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास जाणीवपूर्वक अनुपस्थित राहणाऱ्या नगरपरिषदेतील सर्व सत्ताधारी पदाधिकारी व अधिकारी यांचा काही सामाजिक व राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध नोंदविला आहे.
