मुंबई, ३ जून:पवई येथील पासपोली गावात झपाट्याने सुरू असलेल्या २५ मजली इमारतीच्या बांधकामावर गंभीर पर्यावरणीय आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकल्पाशी संबंधित बिल्डर प्रशांत शर्मा यांच्यावर रॉयल्टी चोरी आणि बिनपरवानगी माती खोदकाम केल्याचे आरोप होत आहेत. पर्यावरण प्रेमींचा इशारा आहे की या बेफाम खोदकामामुळे भूगर्भातील जलस्तर आणि भूगर्भीय रचना यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या परिसरात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या यंत्रसामुग्रीमुळे जवळच असलेला ऐतिहासिक विहार तलाव देखील गळतीच्या धोक्याच्या छायेत आला आहे. इतके गंभीर परिणाम दिसून येत असतानाही अद्यापपर्यंत भूगर्भ व जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी आलेले नाहीत, ही बाब अत्यंत शंकेची ठरते.
पर्यावरण कार्यकर्ते डॉ. राजन माकणीकर यांनी या संदर्भात तीव्र चिंता व्यक्त केली असून ते म्हणाले, “हे फारच आश्चर्यकारक आहे की संबंधित शासकीय अधिकारी अद्याप या ठिकाणी का पोहोचले नाहीत? कुठे प्रशांत शर्मा यांनी या अधिकाऱ्यांना मोठमोठ्या पाकिटांचे आमिष दाखवून गप्प केलं तर नाही ना?”
तसेच, डॉ. माकणीकर यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रशांत शर्मा यांनी मोहम्मद युसूफ खोत ट्रस्ट कडून ही जमीन विकत घेतल्याचा दावा केला आहे. मात्र या दाव्याची कुठलीही अधिकृत कागदपत्रीय तपासणी आजतागायत झालेली नाही. डॉ. माकणीकर यांची मागणी आहे की, या ट्रस्टचे सध्याचे हयात असलेले विश्वस्त यांच्या कडून जमीन विक्रीसंबंधीचे सर्व दस्तऐवज पडताळणीस घेतले जावेत.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र विशेष चौकशी करणे अत्यावश्यक आहे. पर्यावरणपूरक परवानग्या, भूखंड हस्तांतरणाचे कायदेशीर कागदपत्र आणि प्रशासकीय मान्यता यांची सखोल पडताळणी होईपर्यंत बांधकाम कार्य त्वरित स्थगित करण्यात यावे, अशी ठाम मागणी पर्यावरण प्रेमी डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
मुंबई महानगरात झपाट्याने वाढत चाललेली अनधिकृत बांधकामे आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणारे प्रकल्प यामुळे प्रशासनाची कार्यशैली आणि कायद्याचा अंमल यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
‘प्रकल्प बंद होईल, बुकिंग परत करावी लागेल’ – डॉ. माकणीकर यांचा निर्धार
के. ईश्वर फाउंडेशन चे संस्थापक आणि विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी या विषयावर केवळ राज्यातील नव्हे तर देशभरातील निसर्ग व पर्यावरण क्षेत्रातील एनजीओ आणि संस्थांचे लक्ष वेधले आहे.
डॉ. माकणीकर म्हणतात की, “जर वेळेत शासकीय यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही, तर देशभरातील पर्यावरणप्रेमी या प्रकरणाचा जोरदार निषेध करतील.” त्यांनी आशावाद व्यक्त केला की, “लवकरच प्रशांत शर्मा यांना या प्रकल्पासाठी घेतलेली बुकिंग रक्कम परत करावी लागेल आणि हा प्रकल्प बंद करावा लागेल.”
त्यांनी पुढे म्हटलं, “आता वेळ आली आहे की पर्यावरणाला धोकादायक ठरणाऱ्या प्रकल्पांविरोधात सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवावा, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गसंपत्तीचं रक्षण करता येईल.”