महसूल सप्ताहात जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह होणार साजरा
नांदेड दि. 31 जुलै : जिल्ह्यात महसूल विभागामार्फत 1 ऑगस्ट 2025 रोजी ‘महसूल दिन आणि 1 ते 7 ऑगस्ट, 2025 या कालावधीत ‘महसूल सप्ताह-2025’ साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहात नांदेड जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
महसूल दिन व महसूल सप्ताहात विशेष उपक्रम राबविण्याबाबत आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्ष अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसिलदार विपीन पाटील, शंकर लाड आदीची उपस्थिती होती.
या सप्ताहात प्रत्येक दिवशी तहसिल कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विशेष मोहिम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे, महसूल अदातलीचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह सर्व महसूल अधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे दिल्या.
महसूल सप्ताहात नांदेड जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असून यात 156 गावांत गाव तीथे स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. एम-सँड’ धोरणाची अंमलबजावणी, गावातील जे मोठे रस्ते अतिक्रमण मुक्त झाले आहेत तिथे दुतर्फा वृक्षारोपण करणार, 4 ऑगस्टपासून ऑनलाईन सुनावनीस प्रारंभ. भूसंपादनाचे सॉफ्टवेअर सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या कामाला पुर्णत्वाकडे नेणार. महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मूळ सेवापुस्तके अद्ययावत करण्याचे नियोजन केले असल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिली आहे.
महसूल सप्ताहातील कार्यक्रमांचे स्वरुप
शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन केले आहे.
शनिवार 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात येईल. रविवार 3 ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे. सोमवार 4 ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबविण्यात येईल. मंगळवार 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे थेट लाभ हस्तांतरण झालेले नाही, त्यांना घरभेटी देऊन डीबीटीद्वारे अनुदानाचे वाटप केले जाईल.
बुधवार 6 ऑगस्टला शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करून त्या अतिक्रमणमुक्त केल्या जातील. तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेतले जातील.
गुरुवार 7 ऑगस्टला एम सँड धोरणाची अंमलबजावणी करून नवीन मानक कार्यप्रणालीनुसार धोरण पूर्णत्वास नेले जाईल आणि ‘महसूल सप्ताहाचा’ सांगता समारंभ आयोजित केला जाईल. या महसूल सप्ताहात नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.