बाळंतपणानंतर घरी जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात आईसह नवजात बाळाचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवली कार

कोल्हापूर/गडहिंग्लज: गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर गुरुवारी दुपारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. बाळंतपणानंतर आपल्या सात दिवसांच्या तान्ह्या बाळाला घेऊन घरी परतणाऱ्या मातेचा आणि बाळाचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सुवर्णा राहुल कुंदेकर (रा. अडकूर) असे मृत मातेचे नाव आहे, तर उपचारादरम्यान नवजात बाळाचीही प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर पोलीस तपासात दिरंगाई झाल्याच्या आरोपावरून संतप्त जमावाने नेसरी पोलीस ठाण्यासमोरच अपघातास कारणीभूत कार पेटवून दिल्याने तणाव निर्माण झाला होता.

आनंदावर विरजण, सुखाचा प्रवास ठरला शेवटचा मिळालेल्या माहितीनुसार, अडकूर (ता. चंदगड) येथील राहुल कुंदेकर यांची पत्नी सुवर्णा यांची प्रसूती गडहिंग्लज येथील एका रुग्णालयात झाली होती. सात दिवसांपूर्वी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. गुरुवारी डॉक्टरांनी सुट्टी दिल्यानंतर राहुल हे आपल्या पत्नीला, नवजात बाळाला, दुसऱ्या मुलाला आणि सासूला घेऊन कारने (एमएच ०४ डीएन ३७४९) आपल्या गावी अडकूरला निघाले होते.

दुपारच्या सुमारास गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील नेसरी नजीक कानडेवाडी-शिप्पूर फाट्यावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

आईचा जागीच मृत्यू, बाळाची झुंज अपयशी या अपघातात सुवर्णा कुंदेकर यांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. तर सात दिवसांचे नवजात बाळ, पती राहुल, २ वर्षांचा मुलगा आणि सासू हे जखमी झाले. जखमी बाळाला तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान या चिमुकल्याचीही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. एकाच वेळी आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याने कुंदेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेसरित तणाव: पोलीस ठाण्यासमोरच कार पेटवली अपघातानंतर दुसऱ्या कारचा चालक स्वप्निल रवींद्र रानगे (रा. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यास आणि अटक करण्यास नेसरी पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी केला. शुक्रवारी दुपारी मृतदेह आणि अंत्यसंस्काराचे साहित्य घेऊन ग्रामस्थ नेसरी पोलीस ठाण्यावर धडकले.

पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत जमावाचा उद्रेक झाला. संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत असलेली आणि पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केलेली कार थेट पेटवून दिली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले.

पोलिसांची कारवाई या प्रकरणी कार चालक स्वप्निल रानगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नेसरी पोलीस करत आहेत. मात्र, या दुर्घटनेमुळे आनंद घेऊन येणाऱ्या कुंदेकर कुटुंबावर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply