अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेचे क्रूर कृत्य; पोटच्या दोन मुलांची हत्या केल्याप्रकरणी आईला अटक

न्यू जर्सी: अमेरिकेतील न्यू जर्सी (New Jersey) येथे एका धक्कादायक घटनेत भारतीय वंशाच्या ३५ वर्षीय महिलेला आपल्याच दोन मुलांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रियदर्शिनी नटराजन (Priyatharsini Natarajan) असे या महिलेचे नाव असून, या घटनेमुळे तेथील भारतीय समुदायात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
हिल्सबरो टाउनशिप (Hillsborough Township) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (१३ जानेवारी) संध्याकाळी घडली. मुलांचे वडील कामावरून घरी परतले असता, त्यांना आपली ५ आणि ७ वर्षांची दोन मुले घरात बेशुद्धावस्थेत आढळून आली. यानंतर त्यांनी तातडीने ९११ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. कॉल दरम्यान त्यांनी “माझ्या पत्नीने मुलांचे काहीतरी केले आहे,” अशी शंका व्यक्त केली होती.
पोलिसांनी आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने तोपर्यंत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी प्रियदर्शिनी नटराजन हिला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.
पोलिसांची कारवाई
सोमरसेट काउंटी अभियोक्ता (Prosecutor) जॉन मॅकडोनाल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियदर्शिनी नटराजन हिच्यावर ‘फर्स्ट-डिग्री मर्डर’ (हत्येचा गुन्हा) आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. तिला सध्या सोमरसेट काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले असून, मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तपासात काय समोर आले?
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, प्रियदर्शिनीनेच मुलांची हत्या केली आहे. मुलांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या कुटुंबाबद्दल शेजाऱ्यांना किंवा स्थानिक प्रशासनाला यापूर्वी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती, त्यामुळे या कृत्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेमुळे अमेरिकेतील हिल्सबरो परिसरात आणि तेथील भारतीय समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.