होळी हा आदिवासींचा महत्त्वाचा सण-प्रा. मोतीलाल सोनवणे…

आदिवासी कोळी, ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, भिल, ठाकूर, पारधी, कोकणा, अशा ४७ जमाती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार आदिवासींमध्ये मोडतात हे आदिवासी होळीला काठीची होळी,मोलगीची होळी,होळी पुनव किंवा शिमगा असे म्हणतात. होळी हा आदिवासींचा महत्त्वाचा सण होय.होळीला आदिवासी तनमनाने तल्लीन होऊन जातात. होळीचा एक महिना अगोदरच आदिवासी स्त्री-पुरुष पहाडात/जंगलात जातात आणि होळी तोडून गावात आणून ठेवतात. जंगलात जातात तेव्हा गाणी म्हणतात.रात्री ढोल वाजून नाचतात, होळी जसजशी जवळ येते तसतसे आदिवासींचा उत्साहाला उधाण येते.सणाचे मूळ पदमपुराणात आढळून येते ते असे की धुंडा नामक एक राक्षसीणिनीला महादेवाने वरदान दिल्यामुळे ती मनमानी करू लागली तेव्हा तिचा वध करण्यास वशिष्ठाने एका राक्षसीणिची प्रतिमा जाळून टाकली आणि जळकी लाकडे हातात घेऊन मोठा ध्वनी करावा.अश्लील भाषा वर्तन करून तिची निंदा करावी.तिचा पाठलाग करावा म्हणजे ती व्याकुळ होऊन आपला प्राणत्याग करेल. व शिष्टांच्या युक्तीनुसार आदिवासीनीं तसे केले तेव्हापासून ती पिळा टळली म्हणून आदिवासी होलिकोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात.
दुष्काळ पडला म्हणून काय झाले? पर शिमगा आदिवासी कोळी, ढोर, टोकरे कोळी,कोळी महादेव, कोळी मल्हार,ठाकूर जमातीचाच.गवऱ्या चोरा,लाकडं चोरा,पर शिमगा द्या दणक्यात.
आदिवासींमध्ये होळी पेटविण्याचा मान पाडाखोत, भगत किंवा पोलीस पाटलाचा असतो.सर्व आदिवासी होळीभोवती जमा होतात.नैवेद्य दाखवतात.फेर धरून नाचतात. पारंपारिक लोकगीते म्हणतात. ज्या दिशेला त्यावर्षीचा होळीचा जळणारा बांबू (टोकर) पडला त्या दिशेला शुभ मानतात.एरंडाचे झाड हे सतीचे झाड मानतात. म्हणून खूप मान असतो.होळीला बाशिंग बांधतात.हार घालतात. पानाफुलांनी सजवतात.तिची ओटी असोल्या नारळाने भरतात. होळीला सुवासिनी हळद लावतात ही प्रथा शकुनाचे आहे असे मानतात.पुरणपोळी किंवा शेवाळ्यांचे/काटक्यांचे नैवेद्य देतात.ज्या दिशेला जळणारा खांब पडला त्या दिशेला पावसाळा चांगला होईल.चांगले उत्पन्न येईल अशी त्यांची समजूत आहे. गावातील वाड्यातील, पाड्यातील,सर्वच आदिवासी बेधुंद होऊन वाद्याचा तालावर पारंपारिक नृत्य करतात व लोकगीते म्हणतात.गेर नृत्य प्रकारात २५ ते ३० पुरुष सहभागी होतात. गेर म्हणजे स्त्री वेशातील पुरुष कमरेला साडी, विशिष्ट पद्धतीने चामडी पट्ट्याच्या साह्याने बांधलेली असते. हातात तलवार,अंगावर दागदागिने, पायात घुंगरू डोक्याला फेटा असा साज असतो.काही वादक असतात. त्याप्रमाणे दोन गणवेशधारी पोलीस, दोन राक्षसिनीचे वेश करणारे पुरुष, काही विचित्र सोंग घेतलेली माणस असतात.तसेच एक लाकडी घोडा,ढोलाच्या तालावर नाचणारा माणूस असतो. या नृत्य पथकात ढोल,तारपा, झांज, रोनथे, पिपाण्या, बासरी(पावा) इत्यादी वाद्य असतात. दुसऱ्या दिवशी कर साजरा करतात.त्याला धुळवड किंवा धुलीवंदन असे म्हणतात. लोकांकडून धान्याच्या रूपाने किंवा पैशाच्या रूपाने वर्गणी घेतात त्याला हे आदिवासी फाग असे म्हणतात.मटनखाऊन व दारूपिऊन कर आनंदाने साजरा करतात.

Google Ad
WhatsApp Group