पनवेल एसटी बस डेपोचे रखडलेल्या कामासोबतच आवरे, केळवणे बस वेळेवर लागत नसल्याने नागरिक त्रस्त.प्रवाशांचे प्रचंड हाल.
Adiwasi kranti Marathi news
उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )
प्रस्तावित दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील मुंबई शहराजवळचा पनवेल येथे होत असलेले विमानतळ आहे. हा विमानतळ कोपर-पनवेल भागात बांधण्याचा आराखडा आहे. परंतू याच पनवेल कोंकण,पश्चिम महाराष्ट्रासह स्थानिक पातळीवर रायगड ठाणे याठिकाणच्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या पनवेल बस आगाराचे काम मागील १४ वर्षांपासून बंद आहे. जुने असलेले डेपो जमीनदोस्त करून पाच वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी अद्याप या डेपोच्या रखडलेल्या कामाबाबत शासकीय पातळीवर हालचाली होत नसल्याने पनवेल उरण येथील ये जा करणार्या प्रवाशांचे अत्यंत हाल होत आहेत.उरण ते पनवेल व पनवेल ते उरण या मार्गावर उरण व पनवेल मधील जनता मोठ्या प्रमाणात प्रवास करते.सर्वसामान्य प्रवासी याठिकाणाहून प्रवास करीत असतो.प्रशासकीय पातळीवर अनास्थेमुळे हे डेपोचे काम रखडले आहे.प्रवासी बांधवांच्या संयमाचा अंत झालेला आहे.१४ वर्षे अनेक समस्या झेलत असंख्य प्रवासी प्रवास करीत आहेत. मागे पनवेल प्रवासी संघाकडून एसटी महामंडळ व सरकारच्या धोरणाचा प्रचंड निषेध करण्यात आले होते. त्यातच भर म्हणुन आवरे, केळवणे बस वेळेवर लागत नसल्याने प्रवाशी त्रस्त आहेत. पनवेल बस आगारात साफसफाईचा अभाव असल्याने येथील प्रवाशांना उग्र घाणीच्या वासाला सामोरे जावे लागते. तसेच येथे प्रवाशांना नीट बसण्याची देखील व्यवस्था नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यातच काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यात प्रवाशांना मात्र प्रचंड हाल सोसावे लागणार आहेत.