इंजि.कु.दामिनीताई दादाराव पाटील ढगे हिला मी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व ताकतीने मैदानात उतरविणार …

भोकर प्रतिनिधी:-
स्वतःला महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हणून घेणाऱ्या नेत्याला आज गल्लीबोळातून फिरण्याची वाईट वेळ का आली? याचा त्यांनी विचार करावा असा टोला भोकर मतदारसंघावर काँग्रेस कडून उमेदवारीचा दावा सांगणारे उद्योजक दादाराव पाटील ढगे पिंपळकौठेकर यांनी उपरोधिकपणे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना लगावला. त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचाच विकास केला असल्या मुळे ही वाईट वेळ त्यांच्यावर आली असल्याचे बोलताना सांगितले.ते दि.५ ऑगस्ट रोजी भोकर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा शाल,हार,डायरी व पेन देऊन यथोचित सन्मान केला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की अशोक चव्हाण यांनी मी भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणणार अशा कोरड्या वल्गना करून गेली १० ते १५ वर्षा पासून त्यांनी भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुसते झुलवत ठेवले.तसेच भोकर येथे एमआयडीसी न आणता केवळ सुशिक्षित तरुणांना थापा मारून झुलवत ठेवले.त्यामुळे भोकर मतदारसंघातील हजारो सुशिक्षित युवक आजही रानोमाळ भटकत बेकारीच्या अवस्थेत आपले जीवन जगत आहेत.
त्यांच्या काळात त्यांनी केवळ काही कामाचे उद्घाटन करून नारळे फोडली पण प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम तडीस नेले नाही.फक्त देखावा उभा करून जनसामान्यांना भुलवीत ठेवण्याचे काम केले.पक्षातील कोणत्याही सामान्य कार्यकर्त्यांना कधीच मोठे होऊ दिले नाही.उलट त्यांच्या मागे वेगवेगळी नको ते ससेमिरा लावून हैराण करून सोडले. विनाकारण माझी २० कोटीची वाहणे जप्त करून वनविभागा कडुन शील लावायला लावले असा खळबळ जनक आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
काँग्रेसने मला पक्षाचे तिकीट दिले तर माझी उच्चशिक्षित मुलगी इंजि.कु.दामिनीताई दादाराव पाटील ढगे हिला मी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व ताकतीने मैदानात उतरविणार असून भोकर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकार बांधवांनीही मला सहकार्य करावे अशी विनंती उपस्थित पत्रकार बांधवांना करून पत्रकार परिषदेचा समारोप केला.

Google Ad