भोकर नगरपरिषदेत नगरसेवक प्रतिनिधींचा लुडबुडपणा वाढला दबंग नगरसेवक साईप्रसाद जटालवार यांनी केली तक्रार..

भोकर (प्रतिनिधी): भोकर नगरपरिषदेमध्ये नगरसेवक व नगरसेविका प्रतिनिधी यांचा लुडबुडपणा वाढला असून या असंवेधानिक लोकांनी नगरपरिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये तसेच विशेष सभा किंवा सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी दबंग अपक्ष नगरसेवक साईप्रसाद सूर्यकांत जटलवार यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्य शासनाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू करून महिला लोकप्रतिनिधींना स्वबळावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नगरसेविका आपल्या अधिकारांचा स्वतंत्रपणे वापर करून नगरपरिषदेच्या कामकाजात सहभाग घेणे अपेक्षित आहे. मात्र काही ठिकाणी नगरसेवक किंवा नगरसेविका प्रतिनिधी यांच्या माध्यमातून कामकाजात हस्तक्षेप होत असल्याची बाब समोर येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महिला लोकप्रतिनिधींना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगरसेविकांच्या कामकाजात इतर कोणत्याही प्रतिनिधींनी हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. नगरसेविकांच्या नावावर इतर व्यक्तींकडून कामकाज चालविणे हा प्रकार “प्रॉक्सी गव्हर्नन्स” म्हणून ओळखला जात असून तो प्रशासनिकदृष्ट्या अयोग्य असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या कामकाजात तसेच विशेष व सर्वसाधारण सभांमध्ये नगरसेवक प्रतिनिधी किंवा नगरसेविका प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून हस्तक्षेप करण्यास बंदी घालावी आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशी मागणी साईप्रसाद जटलवार यांनी प्रशासनाकडे केली आहे.तसेच या संदर्भातील माहिती नगरपरिषद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.