शेतातील सोलार पंप ३८ दिवसांपासून ठप्प; C.I.R. सोलार कंपनीला ब्लॅकलिस्ट करा – शेतकऱ्याची संतप्त मागणी!”

भोकर प्रतिनिधी:-भोकर तालुक्यातील रेणापूर येथील शेतकरी गणपती नारायण कानिंदे यांनी महाडिबीटी (MAHADBT) योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या सोलार पंपाबाबत गंभीर तक्रार दाखल केली असून, तब्बल ३८ दिवसांपासून पंप बंद अवस्थेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित C.I.R. Pumps (Solar Pump Division) या कंपनीकडून वारंवार कळवूनही दुरुस्ती न झाल्याने शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.सदर प्रकरणात कानिंदे यांनी कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय भोकर व तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाडिबीटी योजनेतून मंजूर झालेला सोलार पंप सुमारे पाच महिन्यांपूर्वी बसविण्यात आला होता. मात्र, “Controller Protection Short Circuit” या तांत्रिक बिघाडामुळे पंप पूर्णपणे ठप्प झाला आहे.या संदर्भात संबंधित कंपनीचे एजंट व कस्टमर केअरशी अनेक वेळा संपर्क साधूनही केवळ आश्वासने मिळाली; प्रत्यक्षात दुरुस्तीचे कोणतेही काम झाले नाही. विशेष म्हणजे, ३८ दिवस उलटूनही कंपनीकडून कोणीही प्रत्यक्ष पाहणीसाठी आले नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान होत असून, शेतकऱ्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यामुळे आर्थिक तोट्यासोबत मानसिक तणावही वाढला आहे. शासनाच्या योजनेतून बसविण्यात आलेल्या उपकरणांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर असताना त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तक्रारदाराने प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की, संबंधित C.I.R. सोलार कंपनीवर तात्काळ कारवाई करून तिला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे, सोलार पंप त्वरित दुरुस्त करण्यात यावा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. तसेच भविष्यात अशा प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी कंपनीकडून लेखी हमी घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणामुळे महाडिबीटी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणती ठोस कारवाई केली जाते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply