भोकरमध्ये ‘बँक ऑफ बडोदा’च्या बँक मित्रांचा उच्छाद; तक्रारीनंतरही प्रशासन ढिम्म, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक लक्ष देणार का?
नोभोकर (प्रतिनिधी):
बँक ऑफ बडोदाच्या भोकर शाखेअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘बँक मित्र’ (BC/CSP) केंद्रांच्या मनमानी कारभाराने सध्या सीमा ओलांडली असून, नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या केंद्रांमुळे बँक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बँकिंग क्षेत्रातील मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासून भोकर शहरातील एकाच परिसरात आणि अत्यंत हाकेच्या अंतरावर अंदाजे चार बँक मित्र केंद्रे थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नियमबाह्य कृत्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची मोठी दिशाभूल होत असून, याविरोधात शास्त्री नगर येथील सजग नागरिक माधव नरसिंग मेकेवाड यांनी थेट बँक व्यवस्थापक आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार ईमेलद्वारे करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
वास्तविक पाहता, ज्या दुर्गम किंवा गरजू भागात प्रत्यक्ष बँकेची शाखा नाही, अशा ठिकाणी बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी ‘बँक मित्र’ किंवा ‘CSP’ केंद्रांना परवानगी दिली जाते. मात्र, भोकर शहरात या नियमावलीला पूर्णपणे बगल देण्यात आली आहे. एकाच गल्लीत किंवा अत्यंत जवळच्या अंतरावर अनेक केंद्रे कार्यान्वित झाल्यामुळे तिथे सेवा देण्याऐवजी केवळ व्यावसायिक स्पर्धा आणि कमिशनचा खेळ रंगल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात बँकिंग सेवेची खरोखर गरज आहे, तिथे केंद्रे देण्याऐवजी चक्क बँकेच्या शाखेच्या ‘कुशीतच’ ही केंद्रे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे व्यवहारांमधील पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली जात असून, ग्राहकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
या गंभीर संदर्भात माधव मेकेवाड यांनी पुणे येथील प्रादेशिक व्यवस्थापक आणि नांदेडचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून या नियमबाह्य प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची विनंती केली होती. संबंधित केंद्रांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. मात्र, तक्रार देऊन अनेक दिवस उलटले तरीही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. बँक व्यवस्थापनाच्या या संशयास्पद मौनामुळे तक्रारदाराने आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
बँकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, तक्रार देऊनही कारवाई का होत नाही, असा सवाल आता विचारला जात आहे. बँक ऑफ बडोदाचे हे सीएसपी केंद्र अद्यापही पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याने जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आता तरी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार का, की या मनमानी कारभाराला अभय दिले जाणार, याकडे संपूर्ण भोकर तालुक्याचे लक्ष लागले आहे. दोषींवर कडक कारवाई करून बँकिंग व्यवस्थेची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
