महाराष्ट्र गौरव पुरस्कार ने श्री. हेमंत खरात यांचा सन्मान..

मुंबई:-(प्रतिनिधी)मुंबई येथे राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेलफेअर फाउंडेशन व दर्पण पत्रकार संपादक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात युगांत सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. हेमंत खरात यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. समाजकार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या श्री. खरात यांच्या कार्याची विविध स्तरांवर प्रशंसा होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली युगांत सामाजिक फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, दिव्यांग सहाय्य आदी क्षेत्रांत उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतो.
या सन्मान सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. रेल्वे प्रबंधक मुंबई श्री. पी. एम. वायकर, जनकल्याण अपंग पुनर्वसन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रविंद्र तांबे, कृषी विभाग मंत्रालयाचे उपसचिव श्री. अंबादास चंदनशिवे, सिने अभिनेत्री सुषमा गायकवाड, मंत्रालयाचे सचिव श्री. विकास थोरात, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण, मंत्रालयाचे सचिव श्री. भारत वानखेडे, रेल्वे यात्री संघ सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती दीपमाला कांबळे, रेल्वे यात्री एकता मजदूर संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. नंदकुमार पांडे तसेच मुंबईचे पोलीस निरीक्षक श्री. संभाजी कठारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना श्री. हेमंत खरात यांनी हा सन्मान संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगत आयोजक संस्थांचे आभार मानले. समाजहितासाठी अधिक जोमाने आणि व्यापक पातळीवर कार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात श्री. खरात यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply