पंचशील नगर भीम जयंती मिरवणुकीत वाजला कर्णकश आवाजात डीजे

पोलीसात गुन्हा दाखल

______________________

​भोकर /प्रतिनिधी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डी.जे. वाजवल्याप्रकरणी भोकर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. याप्रकरणी मंडळाचे पदाधिकारी आणि डी.जे. चालक अशा एकूण ५ जणांविरुद्ध ३० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​​दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी भोकर शहरात जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान पंचशील बुद्ध विहार ते माऊली मंगल कार्यालय या मार्गावर डी.जे.चा मोठ्या आवाजात वापर सुरू होता. या आवाजाचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्यामुळे ‘डायल ११२’ वर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
​मिळालेल्या तक्रारीनुसार, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन डी.जे. बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आरोपींनी पोलिसांच्या आदेशाला न जुमानता उलट मोठ्या आवाजात डी.जे. चालूच ठेवला. मिरवणुकीपूर्वीच प्रशासनाने या पदाधिकाऱ्यांना ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ कलम १६८ अन्वये लेखी नोटीस देऊन डी.जे. न वापरण्याचे आदेश दिले होते, तरीही त्यांनी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन केले.
​​ पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर आदेशाचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पीएसआय मोहन राठोड यांनी फिर्याद दिली. त्यावरून ३० एप्रिल २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम २२३ व ३(५) नुसार प्रतिक दिगंबर कदम (अध्यक्ष, भीम जयंती मंडळ), शुभम दिगंबर पवार (उपाध्यक्ष), आशिष पुरभाजी पावडे (सचिव),संतोष आनंद बनसोडे (डी.जे. मालक, रा. गणेश नगर, नांदेड),मॅडी सुभाष कांबळे (डी.जे. ऑपरेटर, रा. विष्णुपूरी, नांदेड) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील पोलीस निरिक्षक अजीत कुंभार यांचा मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप आनेबोईनवाड हे करत आहेत.

Leave a Reply