नांदेड रेल्वे स्थानकावर मानवी तस्करीविरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

नांदेड | दि. ३० जुलै २०२५ – जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, नांदेड या संस्थेच्या ‘जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन’ प्रकल्पांतर्गत जागतिक मानवी तस्करीविरोधी दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत नांदेड रेल्वे स्थानक व बस स्थानक येथे पोस्टर व बॅनरद्वारे माहिती प्रसारित करण्यात आली. तसेच ध्वनिफितीद्वारे बाल तस्करीविषयी जागृतीपर संदेश दिले गेले. प्रवासी, रेल्वे कर्मचारी, विक्रेते, दुकानदार व हमाल वर्ग यांना बाल तस्करीची लक्षणे ओळखणे आणि संशयास्पद प्रकरणांची सुरक्षित तक्रार करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे बाल तस्करीसंदर्भातील कायदे, नागरिकांची भूमिका आणि प्रशासनाच्या जबाबदाऱ्यांबाबत जनमानसात जागरूकता निर्माण करणे हा होता.
या जनजागृती उपक्रमात पोलीस, महिला व बाल कल्याण विभाग, चाईल्डलाइन, रेल्वे सुरक्षा बल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRPF) यांसह विविध शासकीय आणि स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या.
मुख्य कार्यक्रम नांदेड रेल्वे स्थानकावरील स्थानक व्यवस्थापक कार्यालयात पार पडला. अध्यक्षस्थानी विद्या आळणे (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ए. जी. मोरे (पोलीस उपनिरीक्षक, ह्यूमन ट्रॅफिकिंग सेल), माधवराव एम. (पोलीस उपनिरीक्षक), स्वाती ठाकूर (पीएसआय, जीआरपीएफ पोलीस स्टेशन), एएसआय डी. हरजी (RPF नांदेड), कल्पना राठोड (संरक्षण अधिकारी), शीतल वाघमारे व आशा धुळे (महिला पोलीस कर्मचारी), ऐश्वर्या शेवाळे, दीपाली हिंगोले (चाईल्डलाइन समन्वयक), आकाश मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक निलेश कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन आशा सूर्यवंशी यांनी मानले.
या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील विविध यंत्रणा एकत्र येऊन बाल तस्करीविरोधात संयुक्त कृती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संवाद, सहकार्य आणि समन्वयाच्या माध्यमातून बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले गेले, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.