वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना मोंढा परिसरात झालेला बॅग लिफ्टिंगचा मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

नांदेड: जिल्ह्यातील गुन्हेगारीला कोठडी मध्ये घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत विशेष मोहीम हाती घेतली असुन. या मोहिमेअंतर्गत वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना मोंढा परिसरात झालेला बॅग लिफ्टिंगचा मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातून एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचे १८ लाख रुपये रोख हस्तगत केले आहेत.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा अशा तीन राज्यांत फिरवली होती. तपासादरम्यान सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, ५० लोकांचे सायबर फूटप्रिंट्स आणि १५ लोकांचे नॅटग्रिड डिटेल्स तपासण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोल्हापूर, सांगली, ठाणे, मुंबईसह बिदर आणि तेलंगणात तळ ठोकून होते. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांना हा गुन्हा कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील टोळीने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड पोलिसांनी शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. १८ डिसेंबर रोजी चंद्रशेखर ओमप्रकाश छत्री (४५, रा. भद्रावती, जि. शिमोगा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने आपले साथीदार अजय बाबू जाधव, नंदकुमार दिलीप चंदू आणि अंजन्नेलु छत्री यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी आरोपीकडून १८ लाख रुपये जप्त केले असून, इतर फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तपासी पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply