बेपत्ता असलेल्या २७ वर्षीय तरुणीचा मृतदेह पार्क केलेल्या कारखाली आढळला; परिसरात खळबळ

ग्रेटर नोएडा: ग्रेटर नोएडा येथील बीटा-२ सेक्टरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी कामावर गेलेल्या एका २७ वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी सकाळी एका पार्क केलेल्या कारखाली संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव दीपा (वय २७) असून ती मूळची उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्याची रहिवासी होती. दीपा ग्रेटर नोएडातील बीटा-२ सेक्टरमध्ये आपल्या लहान भावासोबत एका भाड्याच्या घरात राहत होती आणि नोएडा सेक्टर ६० मधील एका खासगी कॉल सेंटरमध्ये काम करत होती.

रविवारी सकाळी दीपा नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाली होती, मात्र ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. तिचा फोनही स्विच ऑफ येत होता. त्यामुळे चिंतेत पडलेल्या तिच्या लहान भावाने पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. सोमवारी सकाळी स्थानिक रहिवाशांना बीटा-२ सेक्टरमधील एका पार्कजवळ उभ्या असलेल्या कारखाली एका तरुणीचा मृतदेह दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली.

कुटुंबाचा एकमेव आधार दीपाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपाच्या आई-वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते. ती आपल्या दोन लहान भावांचा सांभाळ करत होती आणि कुटुंबाचा एकमेव आधार होती. तिचा एक भाऊ तिच्यासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहून शिक्षण घेत होता, तर दुसरा भाऊ जयपूरमध्ये काम करतो.

पोलिसांचा तपास सुरू घटनेची माहिती मिळताच बीटा-२ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, “तरुणी पार्कपर्यंत कशी पोहोचली आणि तिचा मृतदेह कारखाली कसा आला, याचा आम्ही शोध घेत आहोत.” यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच, दीपाचे कॉल रेकॉर्ड्स आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तिचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे ग्रेटर नोएडामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.