कन्नड-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकी झाडावर आदळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू

कन्नड: कन्नड-वैजापूर महामार्गावर सोमवारी (ता. १२) सकाळी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बनशेंद्रा ते सिरजगाव दरम्यान घडला.शुभम रमेश सोनवणे (वय २३) आणि रतन बाळू गायकवाड (वय २१, दोघेही रा. रेल-कनकावती, ता. कन्नड) अशी या अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आणि रतन हे दोघे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते. कन्नड-वैजापूर रस्त्यावरील बनशेंद्रा आणि सिरजगावच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटला आणि ती रस्त्यालगतच्या लिंबाच्या झाडावर जाऊन जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. ऐन तारुण्यातील मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने रेल-कनकावती गावावर शोककळा पसरली आहे.